Thursday, April 25, 2024
Homeनगरपणन व्यवस्था शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहिली नाही

पणन व्यवस्था शेतकर्‍यांच्या पाठीशी उभी राहिली नाही

आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली खंत

राहाता (तालुका प्रतिनिधी)- करोना संकटाच्या काळात शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला कृषी व पणन विभागाच्या निष्काळजीपणामुळे शेतकर्‍यांसमोर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण झाली. अडचणीच्या काळातही सरकारची पणन व्यवस्था शेतकर्‍यांच्या पाठीशी सक्षमपणे उभी राहू शकली नाही, अशी खंत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने लॉकडाऊनच्या काळातही शेतकर्‍यांचा शेतीमाल खरेदी करण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था ही शेतकर्‍यांना दिलासा देणारी ठरली असल्याचे त्यांनी सांगितले. राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने शासन नियमाचे पालन करून शेतकर्‍यांचा उत्पादीत माल खरेदी केला. याचा लाभ नगर जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील शेतकर्‍यांनाही झाला. बाजार समितीने कांदा खरेदी मार्केटही सुरू केले. आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी बाजार समितीच्या आवारात कांदा उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकार्‍यांशी संवाद साधला.

आ. विखे पाटील म्हणाले की, करोना संकटामुळे संपूर्ण देश थांबला पण आमचा बळीराजा मात्र काम करीत राहिला. म्हणूनच शेती उत्पादीत मालाचा पुरवठा होऊ शकला. शासनाच्या पणन विभागाची निष्क्रीयता याला कारणीभूत ठरली, असा थेट आरोप केला. शासनाच्या अखत्यारीत येणार्‍या एकाही व्यवस्थेने शेतकर्‍यांचा उत्पादीत माल खरेदी करण्याची इच्छाशक्ती दाखविली नाही. शासनाने शेतकर्‍यांचा शेतीमाल खरेदी केला असता तर रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली नसती.

पण दुर्दैवाने सरकारच्या पणन विभागाला याचे महत्त्व समजले नाही. राज्यातील बाजार समित्या नियोजनपूर्वक सुरू ठेवल्या असत्या तर शेतकर्‍यांना बाजारपेठ मिळाली असती. सध्या उपलब्ध असलेला भाजीपाला शेतकर्‍यांनी विक्रीसाठी बाजारात आणलेला आहे. पण दुसरीकडे मात्र नवीन मालाची लागवड दिसत नाही, कांदा उत्पादकांनीही उत्पादीत झालेला संपूर्ण कांदा बाजारात आणलेला नाही.

त्यामुळे भविष्यात भाजीपाल्या बरोबरच इतरही शेती मालाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती त्यांनी बोलून दाखविली. याप्रसंगी बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, उपसभापती वाल्मिकराव गोर्डे, बाळासाहेब जपे, अशोकराव जमधडे, शरद मते, दिलीप रोहोम, बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर आदी उपस्थित होते.

मागील एक महिन्यापासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दीपक रोहोम आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेल्या अन्नछत्राची आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आवर्जून माहिती घेऊन त्यांनी या संकटाच्या काळात केलेल्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या