Thursday, April 25, 2024
Homeनगरलाथ मारीन तिथं पाणी काढीन हा आजच्या युवकाचा आत्मविश्वास- आ. रोहित पवार

लाथ मारीन तिथं पाणी काढीन हा आजच्या युवकाचा आत्मविश्वास- आ. रोहित पवार

अकोले (प्रतिनिधी)- युवकांच्या वापर केवळ राजकारणासाठी न करता त्यांच्या कौशल्यविकासासाठी सर्व लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी प्रयत्नशील होणे गरजेचे. ‘लाथ मारीन तिथं पाणी काढीन’ हा आजच्या युवकाचा आत्मविश्वास असल्याने त्यांचे उज्ज्वल भवितव्यासाठी आता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आमदार रोहित पवार यांनी केले.

अकोले तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ‘ग्रामीण महाराष्ट्रापुढील आव्हाने व उपाय’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. सार्वमतचे उपसंपादक अमोल वैद्य हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे यांची उपस्थिती होती.

- Advertisement -

आ. रोहित पवार म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रापुढे आज नोकरी, आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण, शेती, व्यापार, उद्योग, शासकीय योजनांचे अज्ञान हे सारे प्रश्न उपस्थित आहेत. सर्वसामान्य व्यक्ती आणि शेवटच्या घटकापर्यंत याविषयी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. ग्रामीण आणि शहरी विभागाला समान संधी मिळाल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. सत्तेत असताना माणसे धोरणे आखतात परंतु ही धोरणे आपण राबविण्यास किती यशस्वी झालो यासाठी प्रसंगी विरोधातही बसण्याची गरज आहे हा ज्येष्ठ नेते शरद पवारसाहेबांचा विचार राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.

मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो. आमच्या बारामतीतही काही भाग जिरायती असून त्यावर कमी पाण्यात शेती विकासासाठी काय करता येईल यावर संशोधन चालू आहे. आपला अकोलेदेखील पावसाचा प्रदेश असला तरी ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ याबरोबरच कमी पाण्यात शेतीचे उत्पन्न कसे वाढेल यावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांचे बरोबरीने प्रयत्न करून अकोलेच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नशील राहू. शासकीय धोरण हे श्रीमंतांसाठी नसून गरिबांसाठी असते. गरिबांपर्यंत शासकीय योजना का पोहचत नाहीत हे समजावून घेऊन त्यावर उपाययोजना व्हायला हव्यात.

अकोलेत मुख्य व्यवसाय हा पर्यटन आणि पूरक व्यवसाय शेती हा व्हावा. युवकांनी यासाठी पुढाकार घ्यावा. बोलल्याशिवाय विकत नाही. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका. इंग्रजी बोलायला आजिबात घाबरू नका. आत्मविश्वासाने बोलत जा, असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला. आज जि.प.शाळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण याच शाळेतील पिढी भविष्यात आपल्याला प्रश्न विचारणार असल्याने शिक्षणासाठी भरीव कामकाज करण्याची व शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करण्याची गरजही आ. पवार यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी आ. डॉ. किरण लहामटेंनी पत्रकारांप्रती कृतज्ञता व्यक्त करून पैसा, गाडी काहीही नसताना अकोल्यातील पत्रकारांमुळे आपण आमदार झालो. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांचा पाठीवर असलेला हातही माझ्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना व्यक्त केली. तालुक्यात पर्यटन व्यवसाय वाढीसाठी तसेच विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. लहामटे यांनी सांगितले.

प्रास्ताविक व स्वागत संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले. पत्रकार संघाच्या गौरवशाली इतिहासाचा त्यांनी आढावा घेतला. पाहुण्यांचा परिचय प्रकल्पप्रमुख भाऊसाहेब चासकर यांनी करून दिला. सूत्रसंचालन उपाध्यक्ष प्रकाश आरोटे व सहसचिव प्रा. चंद्रशेखर हासे यांनी केले.
यावेळी बीजमाता राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, जलतज्ज्ञ सोनाबाई भांगरे, परसबाग तज्ज्ञ शांताबाई धांडे, धानमित्र हिराबाई भांगरे, आदिवासी बँकर्स हिराबाई गभाले, राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराबद्दल ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे यांचा आ. रोहित पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव उत्कर्षाताई रुपवते, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, उद्योजक सुरेश गडाख, जि. प. सदस्य रमेशराव देशमुख, सुनीताताई भांगरे, अगस्तीचे ज्येष्ठ संचालक प्रकाशराव मालुंजकर, मीनानाथ पांडे, गुलाबराव शेवाळे, बाळासाहेब ताजणे, ज्येष्ठ नेते सुरेश खांडगे, भानुदास तिकांडे, सुधीर शेळके, प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमुख, प्राचार्य संतोष कचरे, बायफचे जितीन साठे, निवृत्त प्राचार्य डी. बी. फापाळे, रामदास सोनवणे, व्ही. एस. गायकवाड, शिवाजी बिबवे, शांताराम मोहिते, कॉ. आर. डी. चौधरी, अमित भांगरे, प्रतिभा घुले, डॉ. रमा कुलकर्णी, अ‍ॅड. पुष्पा चौधरी, अनिता आरोटे आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर व प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्याचे राजकारण अवघड
काना, मात्रा, वेलांटी, उकार नसलेले अहमदनगर जिल्ह्याचे नाव सरळ असले तरी याठिकाणचे राजकारण अवघड आहे. पूर्वी लोकांना मुंबई जवळचेच कर्जत आठवायचे. विधानसभा निवडणुकीनंतर आता अहमदनगरच्या कर्जतची ओळख मोठी झाली. कर्जत-जामखेडची ओळख विकासकामातून अधिक प्रभावशाली करण्याचा मानस आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.

सर्वधर्माप्रती आदरभाव
आ. रोहित पवार यांचे भाषण चालू असताना जवळच्या मशिदीत अजान सुरू झाले. अजान संपेपर्यंत आ. रोहित पवार यांनी आपले भाषण बंद ठेऊन सर्वधर्माप्रती आपला आदरभाव असल्याचे कृतीतून दाखवून दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या