Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

सातबारा कोरा करणारांनी जाचक अटी टाकून शेतकर्‍यांना चिंताग्रस्त बनविले

Share
सातबारा कोरा करणारांनी जाचक अटी टाकून शेतकर्‍यांना चिंताग्रस्त बनविले, Latest News Mla Radhakrushan Vikhe Statement Government Rahata

आ. राधाकृष्ण विखे : खातेवाटप वाद संपल्यावर सरकारला शेतकर्‍यांची आठवण

राहाता (तालुका प्रतिनिधी) – शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार, असे आश्वासन देणार्‍यांनीच कर्जमाफी योजनेत जाचक नियम आणि अटी टाकून शेतकर्‍यांना चिंताग्रस्त बनविले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना 25 हजार रुपये देण्याची घोषणाही मुख्यमंत्री विसरुन गेले आहेत.

मंत्र्यांचे खातेवाटप, बंगले वाटप आणि आता पालकमंत्री पदावरुन सुरू झालेले वाद संपल्यानंतरच यांना शेतकर्‍यांची आठवण होईल. वेळ पडली तर आघाडी सरकारला मुक्ती मिळेल. पण यांच्या वादात शेतकरी कर्जमुक्त होणार नाही, असा खोचक टोला माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला.

तालुक्यातील वाकडी येथे सुमारे 3 कोटी 57 लाख रुपयांच्या विकास कामांचा भुमिपूजन व उद्घाटन समारंभ आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव बधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, चेअरमन मुकूंदराव सदाफळ, व्हा. चेअरमन प्रतापराव जगताप, जि. प. सदस्या कविता लहारे, पं. स सदस्या अर्चनाताई आहेर, सरपच धनंजय धनवटे, वाकडीचे सरपंच डॉ. संपतराव शेळके, राजेंद्र लहारे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. आर. वर्पे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

राज्यात 300 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील सर्वाधिक संख्या ही मराठवाड्यातील शेतकर्‍यांची आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांच्या या आत्महत्या आहेत याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले की, सत्ता नाट्याच्या खेळात महाविकास आघाडीचे नेते शेतकर्‍यांना विसरले आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी आम्ही सातबारा कोरा करणार, अवकाळीग्रस्त शेतकर्‍यांना 25 हजार रुपये देणार, अशा घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्या होत्या. पण त्याचा विसर त्यांना पडला आहे.

कर्जमाफीची फसवी घोषणा त्यांनी केली. या योजनेची परिपत्रक पाहून शेतकरी आता अधीक चिंताग्रस्त झाला आहे. जाचक नियम आणि अटींमध्ये ही योजना सरकारने अडकविल्यामुळे सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ किती शेतकर्‍यांना मिळेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मंत्र्यांच्या खाते वाटपावरुन वाद सुरू झाले. आता कोणी कोणता बंगला द्यायचा यामध्ये सरकार दंग आहे. कालपासून कोणी कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायचे याची स्पर्धा लागली आहे. हा सर्व प्रकार राज्याच्या हिताचा नाही. राज्यातील एकूणच गोंधळलेली परिस्थिती पाहता सामान्य माणसाला न्याय मिळेल, असे वातावरण नाही.

सरकार आघाडीचे असले तरी आपल्या मतदारसंघात विकास कामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. यापूर्वीही विकास कामांचा निधी आपण आणण्यात कमी पडलो नाही. निळवंडे धरणाच्या कालव्यांतील कामांची अडचण दूर झाल्याने दीड वर्षात पाणी देण्याचा आपला शब्द होता. पण या आघाडी सरकारच्या धोरणांमुळे यात आडकाठी येती की काय? अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

वाकडी येथील साठवण तलाव, गोदावरी कालवा नुतनीकरण या कामांना आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी वाकडी ग्रामस्थांच्यावतीने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच डॉ.संपतराव शेळके, राजेंद्र लहारे यांची याप्रसंगी भाषणे झाली.

काँग्रेस सेवादलाच्या मुखपत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केल्या गेलेल्या लिखाणाचा आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिव्र शब्दात निषेध केला. स्वातंत्र्यविरांबद्दल केले गेलेले लिखाण सहन करून सत्तेत राहणे कसे शोभते, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!