Friday, April 26, 2024
Homeनगरअहो, बंगला नव्हे, हे तर साधे पत्र्याचे घर

अहो, बंगला नव्हे, हे तर साधे पत्र्याचे घर

आ. निलेश लंके यांनी केला भांडाफोड : मंडलाधिकार्‍यांवर कारवाईच्या सूचना

अहमदनगर (वार्ताहर)- गरीब शेतमजुराच्या मोडकळीस आलेल्या पत्र्याच्या घराच्या जागी मोठा बंगला असल्याचा खोटा अहवाल देऊन त्या गरिबाने सादर केलेले श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचे प्रकरण नामंजूर करण्याचा प्रताप नगर तालुक्यातील चासच्या मंडल अधिकार्‍याने केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आ. निलेश लंके यांनीच थेट त्या गरीब शेतमजुराच्या घराची पाहणी करून भांडाफोड करत तहसीलदार उमेश पाटील यांना मंडल अधिकार्‍यावर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

- Advertisement -

याबाबतची माहिती अशी, नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामस्थांनी 28 जानेवारीला गावात महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान योजना शिबिराचे आयोजन केले होते. सारोळा व परिसरातील गावांमधील पात्र लाभार्थ्यांची संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना तसेच अन्य प्रकरणे दाखल केली होती. ही प्रकरणे सादर करताना चासच्या मंडल अधिकार्‍याकडून सातत्याने नागरिकांची अडवणूक होत होती.

याबाबत काही ग्रामस्थांनी आ. लंके यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारे महेबूब इनामदार यांनीही श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचे प्रकरण दाखल केले होते. मात्र मंडल अधिकार्‍याने ते प्रकरण नामंजूर केले. याबाबत इनामदार यांनी आ. लंके यांच्या जनता दरबारात आपली तक्रार मांडली. आ. लंके यांनी तक्रारीचा निपटारा करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानंतर सोमवारी (दि. 16) पुन्हा इनामदार यांनी आ. लंके यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी मंडल अधिकार्‍यास मोबाईलवर संपर्क साधून विचारणा केली असता त्याने सदर इसम गरीब नाही. त्याचा गावात बंगला आहे. त्याची दोन्ही मुले नोकरीला असल्याचे सांगितले.
मात्र त्या गरीब व्यक्तीकडे पाहून मंडल अधिकार्‍याने सांगितलेले कारण आ. लंके यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी मंगळवारी (दि. 17) दुपारी थेट सारोळा गाव गाठले आणि इनामदार यांच्या घराची पाहणी केली.

त्यावेळी इनामदार यांचा बंगला नव्हे तर मोडकळीस आलेले पत्र्याचे घर असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यामुळे संतप्त झालेल्या आ. लंके यांनी मंडल अधिकार्‍याला फोन लावला. मात्र त्यांचा फोन बंद होता. त्यानंतर त्यांनी तहसीलदार उमेश पाटील यांच्याशी संपर्क साधून चांगलेच सुनावले. तसेच गोरगरिबांची अडवणूक करणार्‍या मंडल अधिकार्‍यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

बंद तलाठी कार्यालायाचाही ‘पंचनामा’
सारोळा कासार येथील तलाठ्याची वर्षभरापूर्वी बदली झाली आहे. तेव्हापासून शेजारील घोसपुरी येथील महिला तलाठ्याकडे सारोळा गावाचा पदभार आहे. मात्र त्या सारोळा गावात इंटरनेट कनेक्टीव्हिटी मिळत नसल्याचे कारण देत घोसपुरी येथूनच दोन्ही गावांचा कारभार पाहत आहेत. त्यामुळे सारोळा येथील तलाठी कार्यालय वर्षभरापासून बंद असल्याची तक्रार ग्रामस्थांनी आ. लंके यांच्याकडे केली. आ. लंके यांनी तलाठी यांना तात्काळ बोलावून घेत तलाठी कार्यालय उघडण्यास सांगितले. मात्र त्याची चावी नसल्याने कुलूप तोडून तलाठी कार्यालय उघडण्यात आले. याठिकाणी आठवड्यातून किमान दोन दिवस तरी या आणि लोकांची कामे मार्गी लावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच सारोळा गावाला तातडीने स्वतंत्र तलाठी नेमण्याच्या सूचना तहसीलदार उमेश पाटील यांना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या