Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रशासन गतिमान करण्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे आदेश

Share
प्रशासन गतिमान करण्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे आदेश, Latest News Mla Lahamte Statement Akole

अकोले (प्रतिनिधी) – लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रशासन गतिमान करण्याचे आदेश आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिले. पोलिसांचा सामान्य माणसांना आधार वाटला पाहिजे आणि दोन नंबरचे धंदे करणार्‍यांना धाक वाटला पाहिजे. आमदार म्हणून मिळालेल्या संधीचे आपण सोने करणार आहोत. यशाने आपण हुरळून गेलो नाहीत, आपले पाय अजूनही जमिनीवरच असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

आमदार डॉ. लहामटे यांच्या संकल्पनेतून अकोले तालुका विकास आराखडा विषयक परिसंवादाचे आयोजन येथील अगस्ती मंगल कार्यालयात काल शनिवारी करण्यात आले होते. तालुक्यातील कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, महिला कार्यकर्त्या आदींकडून त्यांनी तालुक्याच्या विकासा संदर्भात मते जाणून घेतली.

यावेळी बीजमाता राहीबाई पोपेरे, युवा नेत्या उत्कर्षाताई रुपवते, भाकपचे नेते वकील शांताराम वाळुंज, माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे, वकील के. बी. हांडे, भानुदास तिकांडे, संपतराव कानवडे, खंडू वाकचौरे, डॉ. संदीप कडलग, लक्ष्मण आव्हाड, दिनकर वैराट, रवी मालुंजकर, हरीश माने, अंकुश वैद्य, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे तसेच विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले, अकोले तालुका विकास आराखडा या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्यटनाचा मुख्य आत्मा रस्ते आहेत. रोजगाराच्या तालुक्यात मोठ्या संधी आहेत. आरोग्य सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अकोले तालुक्यातील वैद्यकीय सोयी सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

अधिकार्‍यांनी विकास कामाचे प्रस्ताव तयार करावेत, त्यासाठी आवश्यक तो निधी आपण शासनाकडून आणण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. आदिवासी भागात डांग तसेच ‘अकोले महोत्सव’ सुरू करू, अकोलेत क्रीडा संकुल सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यात पर्यटन हा प्रमुख व्यवसाय होऊ शकतो. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला.

माकपचे नेते डॉ. अजित नवले म्हणाले, लोकांना बदल झाला हे दिसावं लागतं. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, पर्यटन आदी प्रश्न आहेत. आदिवासी विभागात जिल्हा उपकेंद्र आले तर प्रवरानगराला जाण्याची गरज पडणार नाही.रोजगाराबद्दल एमआयडीसी चा मुख्य मुद्दा आहे. पाच वर्षात हा प्रश्न आहे. सहकारात सुरू असलेली कार्यसंस्कृती सुधारली नाही तर भविष्यकाळ अवघड असेल. समाजातील राजकीय पक्ष, जाणकार यांनी अकोले तालुका विकास आराखड्यासारखे पवित्र कार्य सुरू आहे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, नवीन अकोले, नवीन ब्ल्यू प्रिंट बनवू या, असे आवाहन डॉ. नवले यांनी केले.

तहसीलदार मुकेश कांबळे यांनी नागरिक सजग असतील तर आपोआपच कर्मचार्‍यावर अंकुश निर्माण होतो, असे सांगितले. प्रशासनाचे तालुका विकासासाठी सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी आदिवासी भागात आमचूर निर्मितीच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले. आदिवासी भागात वरई मिल सुरू करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी कृषीचे बाळनाथ सोनवणे, माजी गटशिक्षणाधिकारी मारुती लांघी, कृषी शास्त्रज्ञ डॉ. डी. बी. बंगाळ, सूर्यकांत शिंदे, नामदेव भांगरे, भाऊसाहेब चासकर, काँग्रेसच्या प्रदेश सचिव उत्कर्षाताई रुपवते, लोकपंचायतचे हनुमंत उबाळे, सुभाष खरबस, उद्योजक विठ्ठलराव पाडेकर, साहित्यिक प्रा. विठ्ठलराव शेवाळे, शांताराम गजे, वकील संभाजी जाधव, प्रा. बापूसाहेब भांगरे, माजी प्राचार्य सहदेव चौधरी, पोपटराव दराडे, बबनराव सदगीर, नानासाहेब दळवी, अरुण सावंत, कोंडाजी ढोन्नर, प्रा. डी. के. वैद्य, विजय पोखरकर, जालिंदर बोडके, डॉ. अविनाश कानवडे, रामलाल हासे, शिराज शेख, स्वप्नील धांडे, त्र्यंबक राऊत, बुळे, जालिंदर बोडके, डॉ. र. मा. कुलकर्णी आदींनी विविध सूचना केल्या. प्रास्तविक व सूत्रसंचालन विनय सावंत यांनी केले.आभार संजय वाकचौरे यांनी मानले.

बीजमाता राहीबाई पोपेरे यांना बोलतांना रडू कसळले. महिलांवरील अत्याचार, दारू विक्री या घटनांमध्ये वाढ सुरू असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली. यावर आमदार डॉ. लहामटे यांनी राही मावशी यांना उद्देशून ‘तुम्ही माझ्या आई सारख्या आहात, तुमच्या भावना लक्षात घेऊन महिलांवर अत्याचार व अवैध दारू विक्री होऊ देणार नाही’ असा शब्द त्यांना दिला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!