आम्हाला संविधान वाचवायचे- मंत्री जितेंद्र आव्हाड

jalgaon-digital
1 Min Read

गांधीजींच्या मार्गाने चालणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- मी कोणाचाही खून न करता लोकशाहीच्या मार्गाने चाललो आहे. मी फक्त लोकशाही मार्गाने बोलतो.ज्यांनी आयुष्यात रक्तपात केला, त्यांना लोकशाही समजणार नाही. हक्क व अधिकार समजणार नाही. यामुळे त्यांची दखल घेण्याची मला गरज नाही, असे मत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या आरोपावर व्यक्त केले.

नगर येथे सभेसाठी आले असता ते बोलत होते. यावेळी आ. संग्राम जगताप, काँग्रेसचे उबेद शेख, राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदी उपस्थित होते. हिंदूराष्ट्र सेनेने सीएए संदर्भात होत असलेल्या सभांवर आरोप करत सभा उधळून लावण्याचा इशारा धनंजय देसाई यांनी दिला होता. त्या आरोपाला उत्तर देताना मंत्री आव्हाड म्हणाले, त्यांना तेवढेच काम आहे, हत्या करणे बॉम्बस्फोट घडवणे, नंग्या तलवारी नाचवणे अशा गोष्टी जमतात. आम्ही गांधींचे वारसदार असून त्यांच्या मार्गाने चालत आहोत.

त्यांच्यासारख्या गोष्टी आम्हाला जमत नाहीत, कारण आम्हाला संविधान वाचवायचे आहे. त्यांना संविधान उडवायचे आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. सीएए संदर्भात आमच्या पक्षाने या अगोदरच भूमिका स्पष्ट केलेली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात निर्णय काय घ्यायचा तो मुख्यमंत्री जाहीर करतील असेही ते म्हणाले. सीएए हा कायदा बहुजनांच्या विरोधात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *