Monday, April 29, 2024
Homeनगर15 जूनला शिक्षण सुरू होणार

15 जूनला शिक्षण सुरू होणार

मुलांचे आरोग्य महत्त्वाचे- शिक्षणमंत्री प्रा. गायकवाड

संगमनेर (वार्ताहर) – राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने येत्या 15 जूनपासून राज्यातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष केले जाणार नाही असे मत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी व्यक्त केले. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अधिकार्‍यांसाठी ऑनलाईन अधिकारी मंच या व्यासपीठावर संदीप वाकचौरे यांनी घेतलेल्या जडणघडण या विषयावरील मुलाखतीत त्या बोलत होत्या.

- Advertisement -

राज्यात 15 जूनपासून व विदर्भात 26 जूनपासून दरवर्षी शाळा सुरू होतात. या वर्षी करोनामुळे शाळा सुरू करण्यासंदर्भात सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांना पर्यायी मार्गाचा राज्य सरकार विचार करीत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी अधिक वेळ डिजिटल स्क्रीनच्या समोर राहणार नाहीत याबाबत काळजी घेण्यात येईल. सध्या राज्य सरकार आकाशवाणी, दूरदर्शन, गुगलचा प्लॅटफॉर्म, दीक्षा या माध्यमातून मुलांचे शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहोचवले जात आहेत. अशा परिस्थितीत मुले चार भिंतीच्या आत आले नाही तरी वेगवेगळ्या मार्गांनी शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहेत.

आजच्या परिस्थितीमध्ये मुलांचे आरोग्य सर्वात महत्त्वाची गोष्ट असून, त्यादृष्टीने शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक पातळीवरची शाळा व्यवस्थापन समिती, शाळा विकास समिती, ग्रामस्तरावरील करोना प्रतिबंध समिती यांनी एकत्र येऊन निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. शाळांच्या इमारती क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या आहेत. त्यासंदर्भात आरोग्य जपण्याच्या दृष्टीने सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध असून तो वापरण्याचा विचार केला जात आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर पाटील आपल्या भाषणात म्हणाले, प्राथमिक शाळेपासून तर उच्च शिक्षणापर्यंत शिकवलेले मंत्री या राज्याला मिळाले आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे आपला जीवन प्रवास उलगडून दाखविताना त्यांनी जे सोसले आहेत ते अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांच्यातला निर्मळपणा आणि समाजाबद्दलची तळमळ यामुळे राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावेल असे मत व्यक्त केले.

या आभासी पैठणी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या अपर सचिव श्रीमती वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक द. गो. जगताप, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पालक सहभागी झाले होते. उपस्थितांचे स्वागत एलइएफ संस्थेचे मधुकर बोन्नरी यांनी केले.

महाराष्ट्राचे स्वतंत्र मॉडेल
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. गुणवत्तापूर्ण शाळा निर्माण करून महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या शाळा याच मॉडेल म्हणून निर्माण करण्यावर भर देण्यात येईल. अधिकाधिक भौतिक सुविधांबरोबर गुणवत्तेसाठी सर्वाधिक प्रयत्न करण्याचे व्हिजन ठेवण्यात आले आहे. या शाळांमध्ये राज्यातील पालकांनी आपल्या पाल्याला प्रवेश घ्यावा यासाठी महाराष्ट्राचे मॉडेल विकसित करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

चरित्रातून मिळते प्रेरणा
लहानपणातील अत्यंत संघर्षमय जीवनाचा प्रवास कथन करत त्यांनी वडिलांनी केलेल्या संस्कार, परिस्थितीने दिलेल्या धड्यामुळे आपण घडल्याचे सांगितले. त्याचबरोबर शाहू-फुले-आंबेडकर, सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी यांच्या चरित्रामुळे आपणाला प्रेरणा मिळाल्याचे सांगत मंत्रिपद हे विद्यार्थ्यांच्या कल्याणाबरोबर समाजहितासाठी वापरत असल्याचे नमूद केले. मोठ्या लोकांची चरित्रे जगण्याला ताकद आणि प्रेरणा देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या