Thursday, April 25, 2024
Homeनगरज्या गडावर माझ्यावर दगडफेक झाली, तिथेच भगवान बाबांनी मला न्याय दिला :...

ज्या गडावर माझ्यावर दगडफेक झाली, तिथेच भगवान बाबांनी मला न्याय दिला : धनंजय मुंडे

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी)- राजकीय द्वेषापोटी कुणी कुठेही गड उभा करू शकत असेल पण गड, गादी व महंत यापेक्षा कोणीही मोठे नाही. भगवानगडापासून मला वेगळे करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी मी भगवानगडावर आल्यावर दगड मारले. पण भगवानबाबा जवळ न्याय आहे. गडाचे महंत स्वतः न्यायाचार्य आहेत अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

माजी मंत्री पंकजा मुंडे समर्थकांनी पाच वर्षांपूर्वी भगवानगडावर तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगडफेक केली होती. त्यावेळी पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी धनंजय मुंडे यांना येथून सुरक्षित हलविले. त्यानंतर भगवानगडावर भाषण बंदीचा निर्णय महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतला. पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडाची निर्मिती केल्यापासून महंत व पंकजा मुंडे यांच्यात मतभेद विकोपाला जाऊन भगवानगडावरील भाषणासाठीच्या अट्टाहासावरून सावरगाव येथील दसरा मेळावाचा जन्म झाला. धनंजय मुंडे यांच्या वाहनावर दगड मारणारे पंकजा मुंडे समर्थक होते व गोपीनाथगडाची निर्मिती या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा नामोल्लेख टाळून अत्यंत खोचक व मार्मिक शब्दात टीका करत महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या विषयी अधिक श्रद्धा व सहानुभूती व्यक्त केली.

- Advertisement -

ना. मुंडे सुमारे दोन तास उशिरा येऊनही चाहते स्वागतासाठी सज्ज होते. गडावर भाषण नाही असा निर्णय कॅबिनेट मंत्री असूनही अत्यंत नम्रतेने स्वीकारत धनंजय मुंडे यांनी जाहीरपणे एकही शब्द उच्चारला नाही. दौर्‍यादरम्यान गडावर कोठेही माईक, लाउडस्पीकर नव्हता. धनंजय मुंडे यांनी जेवणापूर्वी माध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, भगवानगड भगवानबाबानी स्थापन केला आहे. गडाचे पावित्र्य आपण जपले पाहिज.े धर्मकारण व राजकारण या गोष्टी पूर्णपणे वेगवेगळ्या असायला हव्यात. गडापेक्षा कोणीही मोठे होऊ शकत नाही. राज्याचा मंत्री म्हणून नव्हे तर गडाचा परमभक्त म्हणून आपण येथे आलो. येथून पुढे भक्त म्हणूनच राहणार आहे. मठाधिपतीनी गडासाठी काही मागावे एवढा मोठा मी निश्चित नाही. जे काही करायचे ते सेवा म्हणून करू गडावर पुन्हा सन्मानपूर्वक येण्याचे निमंत्रण मिळणे हाच भगवानबाबांचा चमत्कार वाटतो भगवानगड एक शक्तिपीठ आहे मला मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणार असे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांना कळल्यानंतर मुंबई येथे येऊन त्यांनी मंत्री झाल्यावर गडावर समाधी दर्शन व महाप्रसादासाठी येण्याची आज्ञा केली. गडाचे व मुंडे कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे श्रद्धेचे नाते आहे जनतेची खूप सेवा करण्याची संधी मिळावी अशी प्रार्थना आपण भगवानबाबा जवळ केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले भगवान बाबाच्या समाधीचे दर्शन घेऊन मुंडे यांनी भगवान बाबांच्या गादीचे दर्शन घेतले.

महंत नामदेव शास्त्री यांनी भगवान बाबा व पांडुरंगाची मूर्ती देऊन ना. मुंडे यांचा सत्कार केला यावेळी राष्ट्रवादीचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे, पाथर्डी पंचायत समितीचे माजी संभाजी पालवे, बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाट यांच्यासह बीड जिल्ह्यातील आ.बाळासाहेब आजबे, आ.संदीप क्षीरसागर,आ.प्रकाश सोळंके,आ.अमरसिंह पंडित, माजी आ.सुनील धांडे, परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या रेखाताई फड, शेवगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र दौंड, आदिनाथ महाराज आंधळे,आम आदमीचे किसन आव्हाड आदींसह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी प्रवेशव्दारावर क्रेनच्या साह्याने भव्य हार घालून स्वागत केले.

‘श्रध्दा असेल तर पंकजांनीही यावं’

भगवानगड – धनंजय यांची भगवानगडावर श्रध्दा आहे. ते केवळ दर्शनासाठी येत आहेत याचं राजकारण करू नका, भगवानगडावरचं राजकारण केव्हाच संपलय. यापुढे भगवानगडावर राजकीय भाषण होणार नाही, यावर आपण ठाम आहोत, असं म्हणत भगवानगडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री महाराज यांनी श्रध्दा असेल तर पंकजांनीही भगवानगडावर दर्शनासाठी यावं, असं म्हणत राजसत्तेने कधीच गड मोठा होत नाही तो गैरसमज आता सर्वांनी दूर करावा, असं म्हटलं.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर काल प्रथमच भगवानगडावर आले. त्यापूर्वी भगवानगडाचे मठाधिपती महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी एका मराठी दूरचित्रवाहिनीशी बोलताना भगवानगडावरचं राजकारण केव्हाच संपलं असल्याचे म्हटले. ज्यांची गडावर श्रध्दा आहे तो प्रत्येक जण दर्शनाला येतोच. श्रध्दा असेल तर पंकजा यांनीही भगवानगडावर दर्शनासाठी यावं, भगवानगड हा आशीर्वाद देणारा गड आहे. आज धनंजय मुंडे हे दर्शनासाठी भगवानगडावर येत आहेत. त्यांची संत भगवानबाबा आणि भगवानगडावर अपार श्रध्दा आहे. हा गड राजकीय नसून या गडावर राजकीय भाषण होणार नाही यावरही आपण ठाम असल्याचे बाबांनी म्हटले.

- Advertisment -

ताज्या बातम्या