Saturday, April 27, 2024
Homeनगरपेट्रोल बंदी… दूधवाल्यांसोबतच सरकारी कर्मचार्‍यांचीही पंचाईत

पेट्रोल बंदी… दूधवाल्यांसोबतच सरकारी कर्मचार्‍यांचीही पंचाईत

अहमदनगर (प्रतिनिधी) – प्रशासनाच्या आदेशानुसार पंपचालकांनी खासगी वाहनांना पेट्रोल देणे बंद केल्याने आज शेतकरी, दूध विक्रेत्यासोबतच बॅकिंग व सरकारी कर्मचार्‍यांनाही कामाच्या ठिकाणी पोहचण्याची कसरत करावी लागली. पेट्रोलसाठी पंपावर गर्दी झाली पण कलेक्टरांच्या आदेशाचे पालन करत पंपचालकांनी त्यांना पेट्रोल देण्यास नकार दिला. पत्रकार अत्यावश्यक सेवेत असले तरी त्यांनाही पेट्रोल न देण्याचा अजब आदेश कलेक्टरांनी काढला आहे.

कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी सरकारी वाहने, रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय सेवेशी निगडित कर्मचारी यांना ओळखपत्र तपासून पेट्रोल देण्याचे आदेश दिले आहेत. खासगी दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल देऊ नये असे कलेक्टरांच्या आदेशात म्हटले आहे. कलेक्टरांच्या या आदेशामुळे बॅँकेत नोकरी असलेल्या कर्मचाजयांना जाण्याची पंचायत झाली. पंपावर केवळ सरकारी वाहनांनाच पेट्रोल दिले जात होते. सरकारी कर्मचाजयांच्या खासगी वाहनांनाही पंपावर पेट्रोल देण्यास नकार देण्यात येत होता. त्यामुळे घरापासून बंदोबस्ताच्या ठिकाणी जाणारा पोलीस कर्मचारी, अन्न पोहच करणारी वाहने, दूधवाल्यांसोबतच पत्रकारांनाही या आदेशाचा फटका बसला.

- Advertisement -

आज बुधवारी सकाळी जिल्ह्यातील सर्व पेट्रोलपंपावर खासगी दुचाकी, तीन चाकी व चारचाकी वाहनांसाठी पेट्रोल विक्री पूर्णत बंद करण्यात आली. अनेकांना कलेक्टरांनी काढलेल्या आदेशाची माहिती नव्हती. विशेषत: खेड्यातून शहरात आलेल्या दूधवाल्यांची गर्दी पेट्रोलपंपावर झाल्याचे दिसले. दूध विक्री आणि किराणा दुकानांचे टाईमिंगही कलेक्टरांनी या आदेशात बदलले आहेत. नव्या आदेशानुसार किराणा दुकान सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यानंतर किराणा दुकानेही बंद असतील. दूध विक्रीची वेळ पहाटे पाच ते सकाळी 8 आणि सायंकाळी पाच ते सात अशी करण्यात आली आहे. त्यामुळे ाल्या पहाटेच दूध विक्री सुरू होणार असल्याने नागरिकांना पहाटेच घराबाहेर पडावे लागणार आहे. खेड्यातून दूधविक्रेत्यांसाठी हा टाईमिंग अडचणीचा ठरू पाहत असल्याच्या तक्रारी आहेत.

अंमलबजावणीकडे दुर्लक्ष अन् अजब फतवा
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवयाच्या पण त्या सुरू करण्यासाठी ये-जा करण्याकरीता लागणार्‍या वाहनांना पेट्रोल मिळणार नाही, असा आदेश काढायचा. अत्यावश्यक सेवेचा लाभ घेण्यासाठी बाहेर निघालेल्या नागरिकालाही इंधन मिळणार नाही, तशी तजवीज कलेक्टरांनी करून ठेवलीय. एकीकडे सरकार शेतकर्‍यांना दिलासा देणारे निर्णय घेत असताना दुसरीकडे कलेक्टर राहुल द्विवेदी मात्र त्यांना पेट्रोल मिळणार नाही असे आदेश काढत आहेत. पत्रकारांनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यावश्यक सेवेत गणले आहे. मात्र पत्रकारांनादेखील पेट्रोल देवू नका, असा अजब फतवा कलेक्टरांनी काढला आहे. खासगी वाहन वापरण्यास मनाई असल्याचे आदेश आहे. त्याची कठोरपणे अंमलबजावणी करणे सोडून कलेक्टरांनी मात्र पेट्रोलबंदीचा हूकूम सोडलाय, असा सूर नगरकरांतून ऐकू येत असून कलेक्टरांनी पेट्रोल बंदीचा आदेश बदलण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या