Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

एमआयडीसी प्रश्नाचा अजित पवार यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समावेश- आ. डॉ. लहामटे

Share
एमआयडीसी प्रश्नाचा अजित पवार यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समावेश- आ. डॉ. लहामटे, Latest News Midc Akole Mla Lahamate Statement Akole

अकोले (प्रतिनिधी)- अकोले एमआयडीसी प्रश्नाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये समावेश केला आहे. तालुक्यात 20 मार्चपासून ‘आमदारांची राहूटी’ हा उपक्रम राबविणार असून पठार भागात दर महिन्याला ‘जनता दरबार’ घेणार असल्याचे आ. डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.

अकोले विधानसभा मतदार संघात गेल्या चार महिन्यांत सुमारे 70 ते 80 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लागले असून भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. अकोले येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते भानुदास तिकांडे, संपतराव नाईकवाडी, विनय सावंत, राजेंद्र कुमकर, रविंद्र मालुंजकर, अमित नाईकवाडी, दीपक वैद्य, डॉ. रामहरी चौधरी, भाऊसाहेब साळवे, श्री.धोंगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

आ. डॉ. लहामटे म्हणाले, तालुक्यातील शेतकर्‍यांना आवर्तन काळात 12 तास वीज उपलब्ध झाली पाहिजे. यासाठी मी प्रयत्नशील आहे. आमदार निधीतील 3 कोटी मध्ये रस्ते, वीज, कुमशेतचा रस्ता, पिंपरकणे पूल आदी प्रश्न अग्रक्रमाने सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तालुका टँकर मुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून आदिवासी भागातील उपसासिंचन योजना कार्यन्वित करणार आहे. तालुक्यतील भूमीहीन धरणग्रस्त शेतकर्‍यांनासाठी नोकरीची संधी उपलब्ध करून देऊन शहापूर -देवराई रस्त्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

तालुक्यातील सामान्य जनता व माझा या पुढे थेट संवाद असणार असून 20 मार्चनंतर ‘आमदार राहुटी’चा कार्यक्रम राबविणार असल्याचे त्यानी सांगितले. पठार भागातील जनतेसाठी जनता दरबार घेणार असून त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. पक्षविरहीत भरपूर लोकांनी मला मदत केली आहे. त्यामुळे सर्वात शेवटचा माणूस मला फार महत्वाचा वाटतो. अकोले मतदार संघातील लोकांवर मी आहे तोपर्यंत कदापिही अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

निळवंडे कालव्यांच्याबाबत अकोले तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही. धरणग्रस्त पुढार्‍यांनी स्वतः व आपल्या माणसांना अकोले शहरात रोड लगत मोक्याच्या जागा दिल्या असून प्रकल्पग्रस्त पुढार्‍यांनी स्वतःचे घर भरल्याचा आरोप त्यांनी केला. पवन चक्कीला जमिनी देणार्‍या आदिवासी शेतकर्‍यांना कंपनीने फसवले असून त्यांचे अधिकारी दादागिरी करून आदिवासी जनतेला त्रास देत असल्यास त्यांचा लवकर बंदोबस्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात सर्वात जास्त पाणी पडत असून ही त्या भागातील लोकांना शेवटी पिण्यासाठी पाणी मिळत नसेल तर हे दुदैव आहे.

माझ्या कार्यकाळात ह्या बाबत ठोस धोरण घेणार असल्याचे त्यानी सांगितले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे तालुक्याच्या बारा महत्वाचे प्रश्न मांडले असून त्यांनी त्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यामध्ये तोलारखिंड, देवीचा घाट, औद्योगिक वसाहत, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा, अप्पर आंबित, बिताका प्रकल्प, कळसुबाई रोपवे, पर्यटन विकास, पट्टा किल्ला, पिंपरकणे उड्डाण पूल आदी तालुक्यातील महत्वाच्या 12 कामांचा समावेश आहे.

पिपळगाव खांड धरणाचे दोन आवर्तने सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिले आवर्तन आज सोमवारपासून सुटणार आहे. हे पाणी आभाळवाडीपर्यंत सोडले जाईल. राजकीय दबावाला बळी पडणार नाही, असे सांगत पिंपळगावचे पुढील दुसरे आवर्तन 10 ते 15 मे दरम्यान सोडण्यात येईल. आवर्तन कालावधीत पाण्याची नासाडी होणार नाही, यासाठी लक्ष देण्यात येईल असेही आ. डॉ. लहामटे यांनी सांगितले.

अलीकडेच झालेल्या अर्थसंकल्पात कर्ज माफीचे 120 कोटी रुपये तालुक्यास मिळाले असून अतिवृष्टीचे 20 कोटी रुपये तालुक्यातील शेतकरी बांधवांस मिळणार आहेत. एमआयडीसी बाबतचा मुद्दा हा आमच्या ब्लु प्रिंटमधील मुद्दा असून तो लवकरच सोडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रश्नी उपमुख्यमंत्री अजित पवार व स्वतः शरद पवार यांनी यात विशेष लक्ष घातले आहे असे ते म्हणाले. पर्यटन विकासाबाबत आपण स्वतः त्यात लक्ष घालणार असल्याचे आ. डॉ. लहामटे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!