Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्हा परिषद : सत्तेच्या जुळवाजुळवीसाठी भाजपची आज नगरला बैठक

जिल्हा परिषद : सत्तेच्या जुळवाजुळवीसाठी भाजपची आज नगरला बैठक

आ. राधाकृष्ण विखे-राम शिंदे यांना निर्णयाचे अधिकार

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी पुढील आठवड्यात 31 डिसेंबरला मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष असावा, यासाठी सदस्यबळ जुळविण्यासाठी आज नगरमध्ये आ. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्हा कोअर कमिटीची बैठक होणार आहे.

- Advertisement -

शुक्रवारी मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत नगर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय जुळवाजुळव करण्यासाठी निर्णय घेण्याचे अधिकार आ. विखे पाटील आणि माजी मंत्री शिंदे यांना देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेत 72 सदस्य असून त्यापैेकी 40 ते 45 सदस्य महाविकास आघाडीकडे असल्याचा दावा करण्यात येत आहे.

जर जिल्हा परिषदेत भाजप वगळता सर्व पक्षाचे सदस्य एकत्र आले असतील भाजपचे 14 सदस्य वगळून महाविकास आघाडीच्या सदस्यांचा आकडा 55 ते 60 पर्यंत पोहचणे आवश्यक होते. मात्र, महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेत 40 ते 45 सदस्यांचा दावा करण्यात येत असल्याने जिल्हा परिषदेत सर्व सदस्य हे त्यांच्या सोबत नाहीत. यामुळे जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळण्याची संधी असल्याची चर्चा मुंबईच्या बैठकीत झाली.

यामुळे शनिवारी दि. 28 ला पक्षाच्या सदस्यांची आणि नेत्यांची नगरला बैठक होणार असून त्यात जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी कशी जुळवाजुळव शक्य आहे, याचे आखाडे मांडण्यात येणार आहेत. सत्ता स्थापनेसाठी निर्णय घेण्याचे अधिकार आ. विखे पाटील आणि माजी मंत्री शिंदे यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार विखे काय डाव टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या