Friday, April 26, 2024
Homeनगरमहापौरांच्या वार्डात पोटनिवडणुकीची रणधुमाळी

महापौरांच्या वार्डात पोटनिवडणुकीची रणधुमाळी

पक्ष उमेदवाराच्या शोधात

अहमदनगर (प्रतिनिधी) – सावेडीतील वार्ड नंबर सहामधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली. अनुसुचित जमाती महिलेसाठी राखीव असलेल्या जागेवर उमेदवार मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची शोधमोहीम सुरू आहे. महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या वार्डात ‘आयात’ उमेदवार देण्याची वेळ भाजपवर आल्याचे सूत्रांकडून समजते.

- Advertisement -

सावेडीतील सहा नंबर वार्डात अनुसुचित जमाती महिलेच्या जागेसाठी 6 फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. शिवसेनेच्या सारीका भूतकर यांचे नगरसेवक पद जात प्रमाणपत्राअभावी रद्द झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे.

या वार्डात भाजपकडून बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, वंदना ताठे आणि शिवसेनेच्या सारीका भूतकर हे चौघे डिसेंबर 2018 च्या सार्वजनिक निवडणुकीत विजयी झाले होते. यातील भूतकर यांचे नगरसेवक पद रद्द झाले. गतवेळी भाजपकडून निवडणूक लढविलेल्या आरती बुगे या पोटनिवडणूक लढविण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे भाजपला आता दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे.

राष्ट्रवादीकडून मंदा गंभिरे यांनी निवडणूक लढविली होती. आरक्षित जागेवर सक्षम उमेदवार मिळणे राजकीय पक्षांना कठिण झाले आहे. त्यामुळे मिळेल त्या उमेदवारावर समाधान मानावे लागणार असे चित्र आहे. आरक्षित जागेवर वार्डात उमेदवार मिळेल अशी चिन्हे नाहीत. त्यामुळे शहराच्या कोणत्याही कोपर्‍यातून उमेदवार आयात करून त्याला पोटनिवडणूक लढविण्याची गळ घातली जात आहे. भाजपचे तीन नगरसेवक असले तरी तेथे भाजपला महापौरांच्या वार्डातच उमेदवार आयात करण्याची वेळ आल्याचे समजते.

भाजपचे तीन नगरसेवक आहेत. पोटनिवडणुकीतही आमचाच उमेदवार निवडून येईल. वार्डात उमेदवाराचा शोध सुरू आहे. मतदार यादीत नाव असलेला कुठलाही उमेदवार देऊन त्याला निवडून आणले जाईल.
– बाबासाहेब वाकळे, महापौर.

- Advertisment -

ताज्या बातम्या