Friday, April 26, 2024
Homeनगरमावा, गुटखा, दारू दुप्पट-तिप्पट भावाने मिळू लागली घरपोहच

मावा, गुटखा, दारू दुप्पट-तिप्पट भावाने मिळू लागली घरपोहच

दारू दुकाने बंद तरीही आडबाजूला अधिक पैसे मोजून होतेय सोय

सोनई (वार्ताहर)- करोनाला प्रतिबंध म्हणून सध्याच्या लॉकडाउन काळात अनेक छोटे-मोठे व्यावसायिक चिंताग्रस्त असतानाच जे जीवनावश्यक अजिबात नाही अशा व्यसनाच्या वस्तू मात्र दुप्पट-तिप्पट भावाने घरपोहच दिल्या जात असल्याचे समजले आहे आणि यावर कहर म्हणजे मावा, गुटखा देशी-विदेशी वर ठोस कारवाई नाही.
याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता समजले की, सोनई, शनिशिंगणापूर, घोडेगाव, वडाळा व सभोवतीच्या गावांमध्ये देशी-विदेशी दारू, मावा, गुटखा या वस्तू नेहमीच्या ओळखीच्या ग्राहकांना दुप्पट तिप्पट मनमानी भावाने पोहोच केल्या जात आहेत.

- Advertisement -

अधिकृत परवानाधारक देशी दारू विक्री दुकाने, परमिट रूम, बियर बार शॉपी शासकीय आदेशाने बंद आहेत. तसेच ज्यांच्याकडे परवानाच नाही मात्र उत्पादन शुल्क व पोलीसांच्या आशीर्वादाने खाजगी हॉटेल, ढाब्यांनी सुद्धा समोरून दारूविक्री बंद करून जवळपास आडबाजूला देशी-विदेशी वाढीव दराने दिली जाते त्यातून तळीराम आपला शौक पूर्ण करत आहेत तर परवानाधारक देशी दारू व परमिट रूम बियर शॉपीमधून देशी-विदेशी दारू बियर जुन्या ग्राहकांना मोबाईल संपर्क केल्यास पोहच करण्याची व्यवस्था होत असते.

ग्राहक आणि विक्रेता यांच्या संभाषणातून ठरलेल्या ठिकाणी एकटा ग्राहक गेल्यास त्याला माल दिला जातो. मात्र मालाची मागितली तेवढी किंमत घेतली जाते. हीच परिस्थिती गुटखा, मावा, सुगंधी तंबाखूची आहे. गावोगाव खेडोपाडी मावा शौकीन तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अगोदर पानटपर्‍यावर घासून मळलेला मावा मिळत होता पण आता या बंदच्या काळात मात्र मावा, गुटखा विक्रेत्यांनी आपली टपरी, हॉटेल या जागा बदलून गुप्त ठिकाणी मावा, गोवा, स्टार गुटखा याच्या पुड्या ठेवल्याची माहिती मिळत आहे. मावा शौकिनांना माल कोठे मिळेल याची माहिती मोबाईल संभाषणातून मिळते किंवा शौकीनांकडून ते ठिकाण समजते आणि वाढीव भावात या पुड्या विकल्या जात असल्याचे समजते.

सध्या हाताने मावा मिळण्याऐवजी मशिनवर मावा करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असून त्यामुळे लागेल तेवढा मावा कमी वेळेत तयार होऊ शकतो. काही विशिष्ट किराणा दुकानांतून माव्यासाठी लागणारी कच्ची व भाजकी सुपारी मुबलक प्रमाणात विकली जाते. रात्री गुप्त ठिकाणी मावा तयार करून दिवसा त्यातले पंटर ह्या मावापुड्या ओळखीच्या ग्राहकांना देत असल्याची माहिती मिळते.

करोना कृपा
देशी-विदेशी दारू, बियर, मावा, जर्दा, गुटखा विक्रेत्यांवर ‘करोना कृपा’ झाल्याची खोचक प्रतिक्रिया एका सेवानिवृत्त शिक्षकाने व्यक्त केली. शासकीय यंत्रणेने लॉकडाऊन काळातच या बेकायदा धंद्यांचा समूळ नायनाट केल्यास व्यसनमुक्ती होऊन भावी पिढी घडू शकेल, असा आशावादही या शिक्षकाने व्यक्त केला आहे.

जीवनावश्यक काय…?
सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या ग्रुपवर एक वस्तुनिष्ठ पोस्ट व्हायरल होऊन मोठ्या प्रमाणात फिरत आहे. त्यात स्पष्टपणे म्हटले आहे की 10 रुपयांची तंबाखू पुडी 30 रुपयाला झाली. 100 रुपयाची दारू 400 रुपयांना झाली आणि 2000 रुपयांचे कांदे 800 रुपयाला झाले. 80 रुपयांची द्राक्ष 10 रुपयाला झाली. 2700 रुपयांचे गहू 1800 रुपये झाले. दूध 33 रुपये लिटर वरून 24 रुपये लिटर झाले. मग तुम्हीच सांगा जीवनावश्यक काय ?

- Advertisment -

ताज्या बातम्या