Friday, April 26, 2024
Homeनगरकरोना रूग्ण वाढल्याने प्रशासनाकडून माळीवाडा सील

करोना रूग्ण वाढल्याने प्रशासनाकडून माळीवाडा सील

अप्सरा टॉकीज चौक, बारातोटी कारंजा रस्ते पत्रे टाकून बंद

अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर, मुकुंदनगरनंतर काहीसा खंड पडलेल्या नगर शहरात करोनाचे रूग्ण आता मोठ्याप्रमाणात वाढू लागले असून, शहराच्या मध्यवस्तीसह केडगाव उपनगरातही रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरातील मध्यवस्ती दाटीवाटीचा परिसर असल्याने या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. माळीवाड्यात रूग्णांची संख्या नऊ झाल्याने हा भाग गुरूवारी पत्रे ठोकून सील करण्यात आला आहे.

- Advertisement -

माळीवाड्यात एक युवक करोनाबाधित आढळला होता. बुधवारी त्याच्याच कुटुंबातील तिघे आणि आता त्याचा मित्र आणि मित्राच्या कुटुंबातील व संपर्कातील चार रूग्ण आढळले आहेत. येथील रूग्णांचा अहवाल येताच जिल्हा प्रशासनाने माळीवाडा भागात कंटेनमेंट घोषित करत परिसर सील केला आहे. यामध्ये गणपती मंदिराजवळ, ब्राह्मण गल्ली, बारातोटी आदी भागात पत्रे ठोकून परिसरात येण्यास आणि जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच माळीवाडा नजिकचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे.

आजच्या घडीला नगर शहरात सथ्था कॉलनी, भवानीनगर आणि माळीवाडा असे तीन कंटेनमेंट झोन आहेत. या भागातील अत्यावश्यक सेवाही बंद असून महापालिकेमार्फत किराणा, दूध, मेडिकल सुविधा पुरविली जाणार आहे. नगर शहरातील दाटीवाटीच्या असणार्‍या मुकुंदनगरमध्ये हॉटस्पॉट एरिया म्हणून घोषित केले होते. शहरात करोनाचा फैलाव होणार नाही, यासाठी त्यावेळपासूनच प्रयत्न सुरू होते.

मात्र, हे प्रयत्न यशस्वी होतांना दिसत नाहीत. सथ्था कॉलनी, भवानीनगर आणि आता माळीवाडा व केडगाव उपनगरात करोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहे. माळीवाड्याप्रमाणेच हळूहळू केडगावची वाटचाल होते की काय, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. माळीवाड्यात येणारे प्रमुख रस्ते पत्रे लावून बंद करण्यात केले असून, कन्टेन्मेंट भागात अत्यावश्यकसह सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. बफर झोनमध्ये अत्यावश्यक सेवांची दुकाने खुली राहतील. कन्टेन्मेंट भागात आता पुढील 14 दिवस अत्यावश्यक सुविधेसह लोकांच्या गरजेच्या वस्तुंचा पुरवठा प्रशासन करणार आहे.

माळीवाड्यातील कन्टेन्मेंट झोन
फुलसौंदर चौक, पंचपीर चावडी, जुना बाजार रोड, मदवाशाह पीर, बारातोटी कारंजा, इवळे गल्ली चौक, वरवंडे गल्ली, सौभाग्य सदन, विळदकर गल्ली, पारगल्ली, विशाल गणपती मंदिराची उत्तर बाजू, आशा प्रोव्हीजन स्टोअर्स.

बफर झोन
संत कैकाडी महाराज व्यापारी संकुल, बगदादी खानावळ, खाटीक गल्ली, सवेरा हॉटेल, नागरे गल्ली, माणकेश्वर गल्ली, भिस्त गल्ली, शेरकर गल्ली, गोंधळे गल्ली, इवळे गल्ली, कौठीची तालीम, दवकर गल्ली, अमन पाटील रोड, माळीवाडा वेस, भोपळे गल्ली.

- Advertisment -

ताज्या बातम्या