Thursday, April 25, 2024
Homeनगरमाळी बाभुळगावची शिक्षक कॉलनी गुन्हेगारीमुळे चर्चेत

माळी बाभुळगावची शिक्षक कॉलनी गुन्हेगारीमुळे चर्चेत

बनावट दारू कारखाना, हवेत गोळीबार, दारू-मटणाच्या पार्ट्या अन दहशत

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे. परंतु, काही लोकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. काही लोक आपले कृत्य थांबवायला तयार नाहीत. पाथर्डी शहरापासून दोन किलोमीटर असलेल्या व माळी बाभूळगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिक्षक कॉलनीमध्ये अलीकडच्या काळात अशाच काही घटना घडल्या. उच्चभ्रू लोकांची कॉलनी म्हणून शिक्षक कॉलनी ओळखली जाते. परंतु, तेथील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे लॉकडाऊन काळात ही कॉलनी चर्चेत आली आहे.

- Advertisement -

येथील रहिवासीही दहशतीखाली जगत आहेत. कायम गुन्हेगारी घटना घडत असताना याची माहिती पाथर्डी पोलिसांना नसेल यावर विश्वास बसणार नाही. एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी वेळीच खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. लॉकडाऊन असल्याने मोठ्या शहरासह ग्रामीण भागात शांतता आहे. सर्वांचे करोना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. सर्व उद्योग धंदे बंद आहे. गुन्हेगारीतही घट झाली आहे. दारू दुकाने बार बंद असल्याने तळीराम हवालदील आहेत. मिळेल त्या दारुवर तल्लफ भागवली जात आहे.

दारुची मागणी लक्षात घेता याच कॉलनीमध्ये जांभळी (ता. पाथर्डी) येथील माजी सरपंच विजय आव्हाड याने एका बंगल्यात बनावट दारू कारखाना उभा केला. लॉकडाऊन काळातही या सराईत गुन्हेगाराची दारू बीड, परभणी जिल्ह्यापर्यंत पोहच होत होती. करोनामुळे सर्वत्र धंदे बंद असताना यांचा धंदा जोरात सुरू होता. पाथर्डी पोलिसांना याची कल्पना नसावी, हे आश्चर्यच आहे. विविध कंपन्याचे लेबल वापरून व मानवी शरिराला घातक असलेल्या रसायनापासून ही दारू निर्मिती केली जात होती. त्याची जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर विक्री केली जात होती.

मागील आठवड्यात या बनावट दारू कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून तो उध्वस्त केला. यानंतर काही दिवसातच येथील जुन्या वसाहतीत गोळीबार झाल्याची अफवा पसरली. कॉलनीतील लोकही भयभीत झाले. राज्य राखीव दलाचे एक कर्मचारी सुट्टीसाठी गावी आले. ते या कॉलनीतीला रहिवासी. सुट्टी संपली पण करोनामुळे ते येथेच राहिले. इतर मित्र परिवाराबरोबर पार्टी करण्याचा उद्योग सुरू झाला.

एका सरकारी वास्तुचे अर्धवट बांधकाम आहे. पाच सहा दिवसांपूर्वी पोलीस कर्मचारी व काही कॉलनीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुले या वसाहतीमध्ये विटांची चूल करून दारू, मटणाची पार्टी करत होते. दारू पिऊन त्यांच्यात वाद झाला. या वादातून चौघांनी पोलीस कर्मचार्‍याला पार्टी ठिकाणी व नंतर घरात घुसून मारहाण केली. दुसर्‍या दिवशी या कर्मचार्‍याने पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मारहाण करणारे गौरव पैठणकर, सागर पैठणकर यांना अटक केली आहे. केतन जाधव व रामा जाधव पसार आहेत.

कॉलनीतील लोक दहशतीखाली
ग्रामपंचायत हद्द असल्याने कमी पैशात प्लॉट मिळत असल्याने अनेक उच्चभ्रू लोकांनी येथे जागा घेऊन बांधकाम केले. स्वस्तात जागा असल्याने याकडे माफियांनीही मोर्चा वळविला. आव्हाड सारख्या सराईत गुंडाने कॉलनीमध्ये बनावट दारुचा कारखाना सुरू केला. उच्चभ्रू लोक दिवसभर नोकरी निमित्त बाहेर गेल्यानंतर गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांकडून नोकरदार लोकांच्या बायकांना त्रास होत आहे. अनेक लोक आहे ती जागा, घरदार विकून बाहेर पडू लागले आहेत. दहशतीखाली जीवन जगण्यापेक्षा लोकांनी बाहेर पडणे पसंत केले आहे. याच कॉलनीमध्ये एक बडे नेतेही रहिवासी आहे. त्यांनी या गंभीर घटनाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या