Type to search

Featured maharashtra मुख्य बातम्या

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीत नो एन्ट्री

Share
महाराष्ट्राच्या चित्ररथाला दिल्लीत नो एन्ट्री, Latest News Maharastra Chitrarath Delhi no Entry

सहा वेळा पटकावला नंबर वन

नवी दिल्ली – यंदा प्रजासत्ताक दिनी होणार्‍या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला केंद्र सरकारने रेड सिंग्नल दाखवला आहे. सरकारच्या नो एन्ट्रीमुळे महाराष्ट्राचा चित्ररथ पथसंचलन करणार नाही. आतापर्यत महाराष्ट्राच्या चित्ररथाने सहा वेळा अव्वल क्रमांक पटकावला आहे.

येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीत इंडिया गेटजवळील राजपथावर पथसंचलन होईल. दरवर्षी निवडक राज्यांच्या चित्ररथांना पथसंचलनाची संधी मिळते. गेली काही वर्ष महाराष्ट्राचा चित्ररथ पथसंचलनात झळकताना दिसतो. महाराष्ट्राच्या चित्ररथाने 2015 नंतर दोन वेळा प्रथम क्रमांकही पटकावला आहे. मात्र 2020 मध्ये चित्ररथाला सादरीकरणाची संधीही मिळणार नाही. मराठी रंगभूमीची 175 वर्ष या संकल्पनेवर यंदा महाराष्ट्र चित्ररथ साकारणार होता.

महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर भाजपच्या हातून सत्ता निसटली. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सीएएविरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं. याचेच पडसाद चित्ररथाला परवानगी नाकारुन उमटत असल्याची चर्चा सुरु आहे.

महाराष्ट्र सरकारसह 32 राज्यांनी चित्ररथाच्या सादरीकरणासाठी केंद्राकडे अर्ज केले होते. परंतु गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने फक्त 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या, तर सहा मंत्रालयांच्या चित्ररथाला परवानगी दिली आहे. संमती नाकारलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगालचा समावेश आहे.

विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे तज्ञ समितीच्या बैठकीत विविध टप्प्यांवर मूल्यांकन केले जाते. समितीमध्ये कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, स्थापत्यकला, नृत्य यांचा समावेश असतो. थीम, डिझाइन आणि व्हिज्युअल इफेक्टच्या आधारे प्रस्तावांचे परीक्षण करुन समिती अंतिम निवड करते. यानंतर, सर्वोत्तम चित्ररथांचा परेडमध्ये समावेश होतो.

1980 मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली होती. 1983 मध्ये बैळपोळा हा महाराष्ट्राचा चित्ररथ
सर्वोत्कृष्ट ठरला होता. 1993 ते 1995 अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवलं होतं. 2015 मध्ये पंढरीची वारी, तर 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने अव्वल स्थान पटकावलं होतं.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!