Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

मदरसा विश्वस्तांना असहकार्य ; तक्रार करणार

Share
मदरसा विश्वस्तांना असहकार्य ; तक्रार करणार, Latest News Madarsa Trustees Not Help Ahmednagar

विलगीकरण कक्षात क्वारंटाईन आणल्याने गावात भितीचे वातावरण

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या लढ्यात योगदानासाठी नगर-पाथर्डी रस्त्यावरील बाराबाभळी (ता. नगर) येथील जामिया इस्लामिया इशातुलउलूम अक्कलकुवा संचलित जामिया मोहम्मदिया मदरसाने विलगीकरण कक्षासाठी देऊ केलेली इमारत कार्यान्वीत झाली, मात्र मनपाचे आरोग्य प्रशासन व बाराबाबळीचे ग्रामस्थ सहकार्य करीत नसल्याने अडचणी येत असल्याचा आरोप मदरसाच्या विश्वस्तांनी केला आहे.

मनपा प्रशासनाने मंगळवारी (दि.7) एप्रिल संध्याकाळी मदरसाची इमारत ताब्यात घेतली. बुधवारी (दि.8) सकाळी येथे क्वारंटाईन केलेल्या 77 जणांना आणण्यात आले. मदरसा प्रशासनाने त्यांच्या जेवणाची जबाबदारी उचलली आहे. मात्र मदरसाच्या स्वयंसेवकांना पास नसल्याने त्यांना भाजीपाला, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तू आणण्यास पहिल्याच दिवशी मोठ्या त्रासाला तोंड द्यावे लागले. मनपा प्रशासनाकडून संध्याकाळपर्यंत स्वयंसेवकांना पास मिळाले नाही. दुसरीकडे मदरसाच्या पलीकडील इमारतीमध्ये रहात असलेल्या मौलाना, शिक्षकांच्या कुटुंबियांना बाराबाबळीच्या ग्रामस्थांनी दूध, किराणा व दळणाची (गिरणी) सेवा बंद केल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी मदरसेचे व्यवस्थापक सय्यद सादिक गफ्फार, विश्वस्त मतीन सय्यद, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आसिर पठाण यांनी बैठक घेऊन ही बाब जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले.

बाराबाबळीचे सरपंच माणिकराव वागस्कर यांच्या निदर्शनास सदर बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी देखील मदरसामध्ये क्वारंटाईन केलेले आणल्याने गावात भितीचे वातारवरण असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे असहकार्य होत असून ग्रामस्थांची समजूत काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

क्वारंटाईन केलेल्यांच्या राहण्याची व जेवणाची जबाबदारी मदरसाने स्विकारली होती. मात्र प्रशासन व गावातील ग्रामस्थ सहकार्य करीत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मदरसामध्ये पाणी, जेवणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्वयंसेवकांना भिंगारसह शहरात भाजीपाला, अन्नधान्यासाठी जावे लागते. पास नसल्याने पोलीस प्रशासन त्यांना ठिकठिकाणी अडवत आहेत. या केंद्रावर एका जबाबदार कर्मचार्याची नेमणुक करावी, पोलीस बंदोबस्त द्यावा, सेवा देणार्‍या मदरसाच्या स्वयंसेवकांना पास द्यावा, अशी मागणी मदरसाच्या विश्वस्तांनी केली आहे.

सहकार्याचे आवाहन
कोरोना सारखे भयंकर संकट देशापुढे उभे ठाकले आहे. या युध्दात सर्व समाज बांधव आपल्या परीने योगदान देत आहेत. प्रशासनाने देखील त्यांना सहकार्य करावे. तसेच क्वारंटाईन केलेले कोरोना पॉजिटिव्ह नसून, त्यांना दक्षतेसाठी विलगीकरण कक्षात ठेवले आहे. चौदा दिवस संपताच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी चुकीची समजूत न करता सहकार्य करण्याचे आवाहन मदरसाच्या विश्वस्तांनी केले आहे.

पास उपलब्ध करून दिले : डॉ. बोरगे
या संर्भात महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मदरसाच्या स्वयंसेवकांसाठी पास उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. तसेच गावातून त्यांना असहकार्य केले जाते किंवा नाही, याबाबत आपणास माहिती नसल्याचे ते म्हणाले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!