Sunday, April 28, 2024
Homeनगरलॉकडाऊन काळातही पुणतांब्यात चोरी

लॉकडाऊन काळातही पुणतांब्यात चोरी

हॉटेल सम्राटमधून 2 लाखांच्या विदेशी मद्यावर चोरटयांचा डल्ला

पुणतांबा (वार्ताहर) – येथील पुणतांबा-श्रीरामपूर रस्त्यावर पुणतांब्यापासून अंदाजे अर्धा किमी अंतरावर असलेल्या हॉटेलसम्राट या रोडलगतच असलेल्या परमीट रुम व बिअर बार हॉटेलमध्ये धाडसी चोरी करून चोरट्यांनी अंदाजे दोन लाख किमतीचे 27 ते 28 विदेशी मद्याचे बॉक्स चोरून पोबारा केला. परिसरात लॉकडाऊन असतांना व पुणतांबा पोलीस स्टेशनला पुरेसा बंदोबस्त असतांना चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याबद्दल परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमुळे हे परमीट रुम बंद आहे. मात्र हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी बाहेरगावचे असल्यामुळे हॉटेलचे मालक प्रशांत वाघ यांनी त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था हॉटेलमध्येच केली आहे. रविवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान तीन चार जणांनी हॉटेलमध्ये प्रवेश करून हॉटेलच्या कर्मचार्‍यांना मारून त्यांच्यात दहशत निर्माण केली व त्यांना खाली तोंड करून झोपण्यास सांगितले. तसेच हॉटेलच्या गोडाऊनमधून विदेशी दारूचे 10 ते 12 बॉक्स काढल्यानंतर त्यांनी चारचाकी वाहनचालकास बोलाविले असावे असा अंदाज आहे. त्यानंतर काही वेळातच चारचाकी आल्यानंतर त्यांनी चोरीचा माल घेवून पोबारा केला असल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.

चोरीची घटना हॉटेलमधील सीसीटीवौही कॅमेर्‍यामध्ये स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्री. वाघ श्रीरामपूर येथे राहतात त्यांना चोरी झाल्याचे समजताच ते सकाळी तातडीने हॉटेलवर दाखल झाले. त्यांनी तातडीने घटनेची खबर राहाता पोलीस स्टेशनला दिली. राहाता पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांनी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान तातडीने घटनास्थळी भेट दिली. श्री. वाघ यांच्या हॉटेलमध्ये यापूर्वीही चोर्‍या झालेल्या आहेत हॉटेलवर पाळत ठेऊन चोरट्यांनी आपले काम फत्ते केल्याचा संशय आहे.

सध्या सर्वच रस्त्यावर नाकाबंदी असूनही चोरट्यांनी कोणत्या मार्गाने चारचाकी वाहन आणले व नेले याबाबत ग्रामस्थामध्ये तर्कवितर्क केले जात आहे. पुणतांबा येथे सातत्याने चोरीच्या घटना होतात मात्र अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. पोलीस निरीक्षक श्री. एस. डी. भोये यांनी चोरीचा तपास लावावा, अशी ग्रामस्थाकडून मागणी केली जात आहे. राहाता पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यत याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या