Wednesday, April 24, 2024
Homeनगरलॉकडाऊनमुळे चहा, सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

लॉकडाऊनमुळे चहा, सलून व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

नेवासा (तालुका प्रतिनिधी)– करोना लॉकडाऊन मधील नियमात बदल करून काही उद्योग व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी चहा व सलून व्यवसाय अजूनही 100 टक्के बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

राज्यात 22 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाला. लॉकडाऊन बरोबरच कलम 144 लागू करून जमाव बंदीचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे लोकांना एकत्र येण्यास पायबंद बसला. करोना हा संसर्ग करणारा विषाणुजन्य आजार असल्याने व तो तोंड, नाक-कान, घसा याशी संबंधीत आजार असल्याने दोन व्यक्तींमधील कमीत कमी अंतर हे एक मीटरचे असावे, असे फिजीकल डिस्टन्सिंगचे बंधन आहे. त्यामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसांपासून ते आजपर्यंत चहाचे हॉटेल-टपर्‍या व सलून-ब्युटी पार्लर 100 टक्के बंद आहेत.

- Advertisement -

यात फक्त आणि फक्त चहा विकून दिवसभर जमा झालेल्या पैशातून कुटुंंबाचा दैनंदिन आर्थिक खर्च भागविणार्‍याची संख्या अधिक आहे. सलूनची दुकाने बंद असल्याने नाभिक बांधवांपुढील अडचणी वाढलेल्या आहेत. सर्वात जवळून आणि फेस टू फेस करावा लागणारा हा व्यवसाय आहे.त्यामुळे स्वतः बरोबरच ग्राहकांची सुरक्षितता महत्वाची आहे हे समजून नाभिक बांधवांनी लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच तीन दिवस स्वखुशीने सलून दुकाने बंद ठेवली होती, त्यानंतर लगेच लॉकडाऊन जाहीर झाला.

आणि सलून दुकानांना टाळेच लागले ते अद्यापपर्यंत कायम आहे. अशा परिस्थिती सलून मालक आणि त्यांचे हाताखालचे कारागीर अशा सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे. कसाबसा एक महिना दम धरलेल्या चहा व सलून व्यवसायिकांचे मनोबल आता तुटले असून फिजीकल डिस्टन्सिंगची मर्यादा अबाधित ठेऊन व सॅनिटायझरचा नियमित वापर करत व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी जोर धरत आहे.

माझे नेवासा एसटी स्टँडजवळ चहा-वड्याचे छोटे दुकान आहे. तसेच घरगुती जेवणाचे डबे पुरविणारी सेवा देणारा मेसचा व्यवसाय आहे. परंतु करोना लॉकडाऊन आणि नेवासा शहरात करोनाचे रुग्ण सापडल्याने लागू केलेली संचारबंदी यामुळे एक महिन्यापासून माझा व्यवसाय बंद आहे. कधी परवानगी मिळते याची वाट पहात घरातच बसून राहण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही.
– गणेश वायकळ, चहा-मेस व्यावसायिक, नेवासा.

कर्ज काढून ब्युटी पार्लरचे दुकान सुरू केले. साहित्य व मशिनरी यासाठी मोठा खर्च झाला. व्यवसाय सुरू होऊन एकच महिना झाली की करोना लॉकडाऊन सुरू झाले. लग्न समारंभ रद्द झाल्याने येणार्‍या मेकअपच्या ऑर्डर बंद झाल्या. महिला वर्ग घरातच अडकून पडल्याने ब्युटी पार्लर मधील सर्व कामे बंद पडली.त्यामुळे दुकानाचे भाडे देणेही अवघड झाले आहे. लवकरात लवकर व्यवसाय सुरू व्हावा, हीच अपेक्षा आहे.
– गीता औटी, संचालिका, ब्युटी पार्लर, भेंडा.

सलूनचा व्यवसाय करणारे सर्व नाभिक बांधवांची उपजीविका याच व्यवसायावर अवलंबून आहे. फार थोड्या जणांकडे शेती व इतर व्यवसाय आहेत. करोनामुळे एक महिन्यापासून हा व्यवसाय 100 टक्के लॉकडाऊन आहे. सलून मालक व कारागीर यांचेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. दुकाने सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक मदत सुद्धा केली पाहिजे. यासाठी नाभिक संघटना सुद्धा शासन दरबारी पाठपुरावा करत आहे.
– दिलीप शिंदे, सलून व्यवसायिक, घोडेगाव.

माझा केवळ चहा विक्रीचा व्यवसाय आहे. दिवसभर विकलेल्या चहाच्या पैशातून 4 व्यक्तींच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. एक महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने होती ती जमा पुंजीही संपली आहे. आता व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न दिल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे.
– अनिल साखरे, चहा विक्रेता, भेंडा.

- Advertisment -

ताज्या बातम्या