Friday, April 26, 2024
Homeनगरलॉकडाऊनचा फटका; शेतकर्‍याने उभ्या टोमॅटो पिकात सोडली जनावरे

लॉकडाऊनचा फटका; शेतकर्‍याने उभ्या टोमॅटो पिकात सोडली जनावरे

नेवासा (तालुका प्रतिनिधी)- लॉकडाऊनमुळे बाजारबंदी, जिल्हा अंतर्गत सीमा लॉक झाल्याने बाजारपेठा उपलब्ध होऊ न शकल्याने सर्वच भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले. त्याचाच परिणाम म्हणून नेवासा तालुक्यातील सुलतानपूर येथील प्रगतशील शेतकरी संभाजी दत्तात्रय खाटीक यांनी आपल्या शेतात एक एकर टोमॅटोचे उभ्या पीकात जनावरे सोडून दिली आहेत.

जगभरात कोरोना विषाणू संसर्ग आजाराने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या दीड महिन्यापासून देशात लॉकडाऊन केल्याने जिल्हाबंदी व बाजार बंदीमुळे सर्वच भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. टोमॅटो तर कवडीमोल भावात विकत असल्याने शेतकर्‍यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

- Advertisement -

उत्पादन चांगले येऊनही भावही नाही आणि मागणी नाही याला वैतागून शेतकर्‍याने आपल्या उभ्या टोमॅटो पिकात जनावरे सोडली आहे. काबाडकष्ट करून पिकवलेल्या भाजीपाल्यास कवडीमोल भाव मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांवर आपल्या उभ्या टोमॅटो पिकात मेंढ्या सोडण्याची वेळ आली आहे.

जगभरात करोना विषाणू संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात लॉक डाऊन केल्याने जिल्हाबंदीने सर्वच भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.
नेवासा तालुक्यातील सुलतानपूर येथील प्रगतशील शेतकरी संभाजी दत्तात्रय खाटीक यांनी आपल्या शेतात एक एकर टोमॅटोचे पीक केले. त्यासाठी सुमारे 70 हजार रूपये खर्चही केला. परंतु सर्वत्र बाजार बंदी व मागणीही कमी झाल्याने योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही, त्यामुळे शेतात मेंढ्या सोडण्याची वेळ या शेतकर्‍यावर आली आहे.

टोमॅटो बाजारापर्यंत नेण्यासाठी गाडी भाडे सुद्धा खिशातून भरण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आहे. टोमॅटो पीकासाठी शेतीची मशागत, ठिबक, मल्चिंग पेपर, खत, औषध, मंडपासाठी तार, बांबू, सुतळी, बांधणी, तोडणी (काढणी) मजुरी आदी खर्चाचा विचार केला तर हजारो रुपये खर्च करूनही हातात काही येणार नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

शेतकर्‍याचा माल शेतात तयार झाल्यावर सुध्दा व्यापारी वर्ग बाजारात आणण्यासाठी तोडणी, क्रेटभरणे, वाहतूक या सर्व बाबींचा खर्च शेतकर्‍यास करावा लागतो. त्यामुळे उत्पादनासाठी लागलेला खर्च व उत्पादनानंतर येणारा खर्च याची गोळाबेरीज केली ताळमेळ बसत नाही. शेवटी या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या