Friday, April 26, 2024
Homeनगरश्रीरामपूर : लॉक डाऊनची ऐसीतैसी, नागरिक रस्त्यावर

श्रीरामपूर : लॉक डाऊनची ऐसीतैसी, नागरिक रस्त्यावर

श्रीरामपूरच्या वॉर्ड दोन कडे पोलिस व प्रशासनाचे दुर्लक्ष

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी व सर्व प्रशासकीय यंत्रणा जनतेच्या भल्यासाठी रात्रंदिवस जीव तोडून राबत असताना शासनाच्या आदेशांना हरताळ फासण्याचे काम शहरातील वार्ड नंबर दोन मध्ये केले जात आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी व प्रशासनाने या परिस्थितीकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

देशासह राज्यात सर्वत्र ‘लॉक डाऊन’ करून कोरोनाच्या भयानक रोगावर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी अडथळे निर्माण करून रस्ते बंद करण्यात आले आहेत. सय्यदबाबा चौक, मौलाना आझाद चौक, गोंधवणी रोड, काजीबाबा रोडही बंद करण्यात आला आहे. मात्र सुभेदार वस्तीतील इतर भागात सर्वत्र नागरिक रस्त्यावर दिसत आहेत. सुलताननगर, कुरेशी जमात खाना, चौधरी बिल्डिंग कॉर्नर, बीफ मार्केट चौक, घरकुल परिसर, गुलशन चौक, सोमेश्वर पथ, बजरंग चौक, मिल्लतनगर पूल, संजयनगर रोड, फातेमा कॉलनी, गोंधवणी पूल, दशमेश नगर चौक या परिसरात सर्वत्र लोकांचे टोळके ठिकठिकाणी इमारतींच्या ओट्यांवर बसून गप्पा मारतांना दिसत आहेत. कुठलेही अंतर न राखता शेजारी बसून चर्चा झडत आहेत.

भाजीपाला व फळविक्रेते बिनदिक्कतपणे गल्लीबोळातील रस्त्यांवर फिरत आहेत. घरकुलातील इमारतींच्या जिन्यावर बसून महिलांच्या गप्पा चालू आहेत.
रस्ते बंद असल्याने पोलिसांची चारचाकी किंवा दुचाकी वाहने या भागात दोन दिवसापासून फिरकलेली नाहीत. कायद्याचा कोणताही धाक नसल्याने नागरिक बिनदिक्कत फिरत आहेत. काही पुढारी छाप कार्यकर्तेच लोकांना घेऊन बसलेले दिसून येत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास श्रीरामपुरात कोरोनाची साखळी खंडित होण्याऐवजी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व परिस्थिची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तातडीने दखल घेऊन या भागातील बाहेर फिरणार्‍या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी सुजाण नागरिकांनी केली आहे.

पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष
शहर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी सर्व प्रमुख मशिदींच्या ध्वनिक्षेपकांवरुन नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. मात्र उनाड व टारगट प्रवृत्तींच्या लोकांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे वर्तमान परिस्थितीवरून दिसून येत आहे. .

- Advertisment -

ताज्या बातम्या