Friday, April 26, 2024
Homeनगरगेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी…!

गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी…!

मशिदी बंद, चौक पडले ओस.. आणि सारे काही सुनेसुने

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कानी न पडणारा अजान चा सुमधुर आवाज, गहिवरुन टाकणारे बयान, इफ्तारची दुआही नाही. रात्री तरावीह नमाजचा मशिदीतून कानी पडणारा आवाज नाही. आणि रोजेदारांना उठवण्यासाठी पहाटे जागविणारे कुणीही नाही. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. मुस्लिम समाज रमजानमध्ये अशा जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांची हृदय पिळवटून टाकणारी आर्त हाक सर्वांच्याच कानी पडत आहे.

- Advertisement -

आत्मशुद्धीचा महिना म्हणून गणला जाणारा महत्त्वाचा रमजान महिना सुरू झाला आहे. 14 ते 15 तास निर्जळी असलेला उपवास कडक उन्हाळ्यातही मोठ्या भक्तीभावाने धरला जात आहे. हा महिना मुस्लिम समाजासाठी एक वरदान असतो. समाजाची या महिन्यावर इतर कोणत्याही बाबींपेक्षा खूप मोठी धारणा आणि श्रद्धा आहे. गरीबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत या महिन्याला आणि महिन्यातील कोणत्याही ईबादतीला सोडत नाही. तशी आजपर्यंतची ख्याती आहे. मात्र, यंदा जगभरात करोना संसर्गजन्य रोगाने थैमान घातल्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या सोशल डिस्टन्स अंमलबजावणीसाठी जगभरातल्या मशिदी बंद आहेत.

सध्या मुस्लिम समाज आणि रोजेदार सर्व सोपस्कार घरातच बसून करीत आहेत. हृदयावर दगड ठेवून हा महिना जड अंतकरणाने आम्ही पार पाडत आहोत, असे नगरसेवक अंजुम शेख, शफिक बागवान, मुक्तार शहा, मुन्ना पठाण, जावेद मेमन, इमरान पोपटिया, अल्ताफ शहा यांनी सांगितले.

या महिन्यात तराविहची नमाज आणि या नमाज नंतर दुवासाठी घुमणारा आवाज, मागितली जाणारी दुवा, इफ्तारसाठी लागणारी रसदार फळे, समोसे आणण्यासाठी होणारी धावपळ आणि ती लगबग हे सर्व केवळ आता आठवणीसाठी मागे उरले आहेत. दिवसभर उपवास असल्याकारणाने संध्याकाळी रोजेदार तळलेल्या खिमा रोल, कांदा व चिकन रोल, समोसे, चिकन पकोडे, मटन व चिकन पॅटीस अशा एक ना अनेक पदार्थांना पसंती देतात. मात्र, यंदा या सर्व पदार्थांना मुकावे लागले आहे, असे फरहान बागवान, आसिफ बागवान, रमिज तांबोळी, हसनैन बागवान म्हणाले.

रोज संध्याकाळी गर्दीने फुलून जाणारे मौलाना आजाद चौक, शिवाजी चौक, गुलशन चौक, हाजी फंक्शन हॉल परिसर, बीफ मार्केट एरिया, काझीबाबा रोड परिसर अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे पकोडे पदार्थ बनवणारे स्टॉल्स, फळांच्या हातगाड्या आता दिसेनासे झाली आहेत. रमजान निमित्ताने कुणाचा रोजा सुटू नये यासाठी अनेक युक्त्या आखल्या जातात. रोजा बरोबर पाच वेळची नमाज पठण करणे, दानाचे महत्त्व यासह प्रेषितांचे महत्व व्यक्त करणारी गाणी सुरेल आवाजात म्हटली जात होती. ढोलकी, पेटी, बासरी वाद्यांच्या साथीने गायिली जाणारी गाणी ऐकत गृहीणी स्वयंपाकाची तयारी करत असतात.

उपवास करणारी मंडळी आवरून नमाज पठणासाठी मशिदीकडे जाण्याची तयारी करतात. रोजादारांसाठी ती सर्वात मोठी पर्वणी मानली जात होती, आता या फक्त केवळ आठवणीच उरल्या असल्याचे मजीद खान पठाण, अश्फाक शेख, रज्जाक बागवान, युनुस जमादार, नजीर मुलांनी, शाहरुख बागवान, शफिक आतार, वाहेद कुरेशी, इब्राहिम तांबोळी, रशीद रंगरेज, लतीफ आतार, साजिद मणियार, मुस्ताक बागवान, इक्बाल काकर, डॉ. तोफिक शेख, प्रा.उमर बागवान, खाजा बागवान यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या