Thursday, April 25, 2024
Homeनगर40 हजार कर्जदार शेतकर्‍यांची माहिती सरकारी पोर्टलवर

40 हजार कर्जदार शेतकर्‍यांची माहिती सरकारी पोर्टलवर

राज्य सरकार करणार पात्र-अपात्रांची तपासणी

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील दोन लाख 18 हजार 217 शेतकरी महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या शेतकर्‍यांच्या कर्ज खात्याचे सरकारी लेखापरीक्षकाकडून ऑडिट पूर्ण झाले आहे. काल शनिवारपासून या शेतकर्‍यांची नावे सरकारच्या कर्जमाफीच्या पोर्टलवर टाकण्यात येत आहेत. शनिवारी दिवसभर 40 हजार शेतकर्‍यांची नावे टाकण्यात आली आहेत. टाकण्यात आलेल्या यादीची सरकार पातळीवर पुन्हा तपासणी होऊन त्यातून अपात्र शेतकर्‍यांची नावे वगळण्यात येणार आहेत.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी सरकारने महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहेत. यात 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज तसेच कर्ज पुनर्गठण माफ केले जाणार आहे. या कर्जमाफीसाठी जिल्हा प्रशासन व सहकार खात्याने शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांना त्यांचे आधार क्रमांक लिंक केले आहेत. त्याचसोबत पात्र असणार्‍या शेतकर्‍यांच्या खात्याचे सरकारी लेखा परिक्षकांकडून ऑडिट करण्यात आले. यात संबंधीत शेतकर्‍यांची कर्ज कोणत्या कालावधीत घेतलेले आहे. त्या कर्जावर बँकांनी आकारलेले व्याज याची माहिती घेण्यात आली. यासह विविध कार्यकारी सेवा संस्थांकडून 28 विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने थकबाकीतील शेतकर्‍यांची माहिती संकलित करण्यात आली होती. संबंधीत कर्जदार शेतकर्‍यांच्या खात्याचे ऑडिट पूर्ण झाले असून आता तालुकानिहाय शेतकर्‍यांची यादी पोर्टलवर टाकण्यात येत आहे.

त्या ठिकाणी सरकार संबंधीत शेतकर्‍यांच्या आधार क्रमांकानूसार तो कर्जमाफीस पात्र आहे की नाही, हे ठरविणार आहे. कर्जमाफीच्या निकषातून सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, बाजार समितीसह अन्य शासकीय समित्यावरील प्रतिनिधी, कर भरणारे शेतकरी यांना वगळण्यात आलेले आहे. सरकार पातळीवर होणार्‍या तपासणी या सर्वांना कर्जमाफीच्या यादीतून वगळण्यात येणार असून त्यानंतर स्वतंत्र पात्र असणार्‍या शेतकर्‍यांची यादी तयार करण्यात येणार आहे.

पात्र असणार्‍या शेतकर्‍यांचे नावे यादीत आल्यानंतर संबंधीत शेतकर्‍याला आपले सरकार केंद्रावर जावून थंम्ब द्यावा लागणार आहे. आधार लिंक असल्यामुळे संबंधीत शेतकर्‍याच्या नावावर असणार्‍या कर्जाची रक्कम किती आहे, हे त्याला समजणार आहे. तसेच बँकेने संबंधीत कर्जदार शेतकर्‍यांची दिलेली माहिती योग्य असल्याचे स्पष्ट होणार आहे. कर्ज रक्कम बरोबर असल्यास संबंधीत शेतकर्‍यांने ती मान्य करून त्याच्या बँक खात्यावर कर्जमाफीची जमा होणार आहे. तसेच माहिती त्रुटी, चुक असल्यास त्यांचा अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार असून त्या ठिकाणी शहानिशा करून करून संबंधीत शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची पुढील प्रक्रिया राबविणार आहेत.

पोर्टलवर टाकण्यात येणारी यादी
अकोले 14980, जामखेड 19600, कर्जत 10538, कोपरगाव 6523, नगर 15019, नेवासा 22589, पारनेर 20468, पाथर्डी 11226, राहाता 9580, राहुरी 14499, संगमनेर 18383, शेवगाव 17891, श्रीगोंदा 34646, श्रीरामपूर 10275 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या