Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्जमाफीचे जिल्ह्यात 1464 कोटी खात्यात वर्ग

कर्जमाफीचे जिल्ह्यात 1464 कोटी खात्यात वर्ग

पालकमंत्री मुश्रीफ यांची माहिती : शेतकर्‍यांसाठी प्रशासनाचे काम चांगले

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह इतर यंत्रणा व्यग्र असतानाही त्यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडेही जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 39 हजार 406 शेतकयांच्या कर्ज आणि व्याज माफीची 1464 कोटी रुपये रक्कम बँकेकडे जमा केल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

- Advertisement -

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत सहकार विभागामार्फत तीन लाख 46 हजार शेतकर्‍यांची नावे अपलोड केली होती. त्यातील दोन लाख 53 हजार 455 शेतकरी पात्र ठरले. त्यातील दोन लाख 47 हजार 202 शेतकर्‍यांच्या बँक खात्यांचे आधार प्रमाणीकरण केले. लगेच कोरोना संकट आल्याने उर्वरित 6 हजार 230 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण राहिले आहे. मात्र, आधार प्रमाणीकरण झालेल्या दोन लाख 39 हजार 406 शेतकर्‍यांच्या कर्जखात्यावरील 1464 कोटी रुपयांची रक्कम संबंधित बँकेकडे जमा केली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोणीही भुकेलेला अथवा उपाशी राहू नये, यासाठी शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली जात आहे. जिल्ह्यात तालुका पातळीवरही आवश्यकतेनुसार केंद्र सुरु केले असून यात राहुरी, पारनेर आणि कर्जतचा समावेश आहे.

निवारा केंद्राला भेट अन् संवाद
विविध ठिकाणच्या स्थलांतरित मजूर तसेच नागरिकांसाठी सुरू केलेल्या निवारा केंद्रांना पालकमंत्र्यांनी भेट दिली. दोन हजाराहून अधिक नागरिक या ठिकाणी असून त्यांना मिळणार्‍या सुविधांची माहिती त्यांनी घेतली. नगर शहरातील बडी साजन मंगल कार्यालयातील निवारा केंद्रास भेट देऊन तेथील नागरिकांशी संवाद साधला.

‘त्या’ भागात दिलासा मिळावा
लॉकडाऊननंतर लोक घरात थांबतील की नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे जेथे कोरोनाचे रुग्ण नाहीत, अशा भागातील लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करावे, असे माझ मत आहे. मात्र, या संदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. जेथे लॉकडाऊन शिथिल केला जाईल, तेथे इतरांना प्रवेश मिळता कामा नये. त्यासाठी तेथील सीमा 100 टक्के बंद केल्या जाव्यात. लॉकडाऊन उठावाव असे अनेकांचे मत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या