Wednesday, April 24, 2024
Homeनगरखातगावला अंगावर वीज पडल्याने 13 मेंढ्या दगावल्या

खातगावला अंगावर वीज पडल्याने 13 मेंढ्या दगावल्या

पाळीव कुत्राही ठार; 27 मेंढ्या जखमी

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील खातगाव येथे वीज पडून संतोष छबू पवार यांच्या 13 मेंढ्या दगावल्याची घटना शनिवारी (दि. 13) दुपारी निमगाव घाणा रोडवर घडली. यामध्ये 27 मेंढ्या जखमी झाल्या आहेत.

- Advertisement -

शुक्रवारपासून नगर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात झाली. शनिवारी दुपारी साडेबारानंतर विजेच्या कडकडाटासह पावसास सुरुवात झाली. येथील संतोष पवार नेहमी प्रमाणे निमगाव घाणा रस्त्यावर मेंढ्या चारण्यासाठी गेले. दुपारी एक वाजेच्या दरम्यान पावसासह विजांचा कडकडाट सुरु झाला. पाऊस सुरु झाल्यामुळे पवार आपल्या मेंढ्यासह जवळच असलेल्या लिंबाच्या झाडाच्या आडोशाला उभे राहिले. काही वेळातच कडकडाटासह पवार यांच्या मेंढ्यांच्या वीज अंगावर पडली. या विजेच्या धक्क्याने 13 मेंढ्यांसह एक पाळीव कुत्रे जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.

भूमिहीन असलेले संतोष पवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. घरी वृद्ध आई वडील, तीन लहान मुले असा परिवार असलेल्या पवार यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. ते शेळ्या मेंढ्यापासून मिळणार्‍या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण करतात. या घटनेमुळे त्यांचे सुमारे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाले असून आता खायचे काय, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी गायकवाड, शासकीय पशु वैद्यकीय अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच मेंढ्यांचे शव विच्छेदन करण्यात आले.

संतोष पवार यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्यांना लवकरात लवकर शासकीय स्तरावर मदत मिळावी यासाठी तहसीलदारांकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच स्थानिक पातळीवरही लोकवर्गणीतून त्यांना तातडीची मदत दिली जाईल.
– संतोष कुलट, खातगाव (संचालक, कृ.उ.बा. समिती, नगर)

- Advertisment -

ताज्या बातम्या