शेवगाव – बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

jalgaon-digital
1 Min Read

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याने नागरिकांतील भीती कमी होणार आहे. एकीकडे कोरोनाचे संकटात व दुसरीकडे या बिबट्याच्या दहशतीने तालुक्यातील भावीनिमगाव येथील नागरिक घरबंद झाले. रात्री शेतात पीकांना पाणी देण्यासाठी कोणी धाडस करेना. मात्र आज दि. ८ रोजी सकाळी हनुमान जयंती दिनी बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्याने त्याला पाहण्यासाठी अनेकांनी धाव घेतली. मनोमन नागरिकांनी संकटातुन सुटका केल्याने हनुमानजीला हात जोडले.

हा बिबट्या भावीनिमगाव परिसरात शेतकऱ्यांनी दोन दिवसापुर्वी पाहिला. गावकऱ्यांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मागील काही वर्षापुर्वी या परिसरात बिबट्याचा वावर होता. या भागात उस, केळी क्षेत्र जास्त असल्याने वन्यप्राण्यांना लपण्यास जागा आहे. या संदर्भात वनविभागाला गावकऱ्यांनी माहिती दिली. त्यांनी पाहणी केली असता त्यांना बिबट्याच्या पावलाचे ठसे मातीत उमटल्याचे निदर्शनास आले. खात्री पटल्यानंतर वनपाल पांडुरंग वेताळ, वनरक्षक अप्पा घनवट, सोमनाथ बुधवंत यांनी येथील प्रगतशील शेतकरी मिलींद कुलकर्णी यांच्या केळीच्या बागेत पिंजरा लावला. लोकांना बाहेर न पडण्याचे आवाहन केले होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *