Friday, April 26, 2024
Homeनगरआईने वाचविले चिमुकलीला

आईने वाचविले चिमुकलीला

बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून सुटका । राहुरी तालुक्यातील थरार

गळनिंब (वार्ताहर)- श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील ज्ञानेश्वरी मारकड या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फुणंगी येथील एका चिमुकलीवर काल सोमवारी भर सकाळी बिबट्याने जीवघेणा हल्ला केला, मात्र, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आईने केलेला आरडाओरडा आणि नशीब बलवत्तर म्हणून ही मुलगी किरकोळ जखमी झाली आणि पुढील अनर्थ टळला. श्रेया मंजाबापू जाधव हिच्यावर नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

- Advertisement -

श्रेया जाधव ही आपल्या घराच्या पडवीमध्ये खेळत असताना शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला चढविला, मात्र आई तसेच घरातील व शेजारील नागरिकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तिला सोडून धूम ठोकली. दोन दिवसांपूर्वी गळनिंब येथील तीन वर्षाच्या ज्ञानेश्वरी नामदेव मारकड या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केला होता.

या हल्ल्यात ती ठार झाली. ही जखम ताजी असतानाच गळनिंबपासून जवळ असलेल्या पिंपळगाव फुणगी येथील श्रेया जाधव या चिमुरडीवर काल (सोमवार) भर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हल्ला केल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

सदर घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी जाधव वस्तीवर गर्दी केली होती. पिंपळगाव फुणगी येथे श्री. जाधव यांच्या घराशेजारील गव्हाच्या शेतात बिबट्याचे ताजे ठसे आढळून आले आहेत. या परिसरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे बोलले जात आहे.

सदर घटनेची माहिती कळताच अहमदनगर वनसंरक्षक अधिकारी आर.जी. देवखिळे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. प्रवराकाठ परिसरातील ही तिसरी घटना असल्याने परिसरात बिबट्याचा दहशतीने वातावरण आहे.

आठ महिन्यांपूर्वी शेजारील शाम जाधव यांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता. आता तर दिवसाढवळ्या बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने शेतात काम करणारे शेतकरी, शेतमजुर धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातून उभारले जाईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या