Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

बटुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजप घेणार

Share
राज्य सरकारचे कर्जमाफीचे धोरण फसवे- प्रवीण दरेकर, Latest News Legislative Council Leder Parvin Darekar Government Criticism Pathardi

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबियांचे सांत्वन

खरवंडी कासार (वार्ताहर)– पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबाची विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी भेट घेत सांत्वन केले. यावेळी त्यांनी मल्हारी बटुळे यांच्या तिनही मुलांची शिक्षणाची जबाबदारी भाजपने स्वीकारल्याची घोषणा केली. तसेच बटुळे कुटुंबाला एक लाख रुपये मदतीचा धनादेश दिला.

यावेळी पक्षाच्या आ. मोनिका राजळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तहसीलदार नामदेव पाटील, प्रांताधिकारी देवदत्त केकाण, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, कृषीअधिकारी प्रविण भोर, पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, उपसभापती मनीषा वायकर, भाजप तालुकाउपाध्यक्ष गोकुळ दौंड, संजय किर्तने, पांडुरंग खेडकर, सोमनाथ खेडकर, विष्णूपंत अकोलकर, काकासाहेब शिंदे, पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, अर्जुन धायतडक, रणजित बेळगे, अशोक खरमाटे, भारजवाडीचे सरपंच विजय राठोड, ज्ञानेश्वर दराडे, मानिक बटुळे, सचिन पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सरकारवर टीका करताना विरोधपक्ष नेते दरेकर म्हणाले, सरकारने सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता. परंतु सत्तेवर येताच सरकारची नियत बदलली आणि तुटपुंजी कर्जमाफी करून शेतकर्‍याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. मल्हारी बटुळे यांच्या अकाली जाण्यामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट आले आहे.

भाजप त्यांच्या कुटुंबासोबत खंबीर उभा असून कुटुंबियांना सरकारी मदत व कर्ज माफ करण्यासाठी सरकारला भाग पाडू. तसेच मल्हारी बटुळे यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पक्ष व आ. मोनिका राजळे घेणार आहेत. तसेच त्यांच्या पत्नीस नोकरी देण्याचे आश्वासनही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी दिले.

दिवंगत बटुळे यांची तिनही मुले प्रतिभावंत असून त्यांना उच्चशिक्षण देण्यासाठी भाजप पक्ष संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘बळीराजा नको करू आत्महत्या’ ही ‘स्व’ लिखीत कविता प्रशांत बटुळे याने सादर करून शेतकर्‍यांची असलेली परवड कवीतेतून सांगितली. शेतकर्‍यांनी नैराश्येतून आत्महत्या करू नयेत.आपल्या कुटुंबियांचा विचार करावा, महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच आहे, हे दुर्दैवी आहे.

सरकारने कायमस्वरूपी यावर तोडगा काढण्यासाठी पक्ष भेद बाजुला ठेवून सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करण्याची मागणी विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी सरकारकडे केली आहे. सतत बँकेने व फायनान्सच्या अधिकार्‍यांनी तगादा लावून अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमक्या दिल्यानेच मल्हारीने आपली जीवनयात्रा संपवली, अशी तक्रार बटुळे कुटुंबियांनी आ. दरेकर यांच्याकडे केली.

त्यावर अधिवेशनात शेतकर्‍यांच्या आत्महत्या व तुटपुंज्या कर्जमाफीसंदर्भात सरकारला धारेवर धरून जाब विचारू असे, दरेकर यांनी सांगितले. दरम्यान दरेकर यांनी श्रीक्षेत्र भगवानगडावर जाऊन संत भगवानबाबांचे दर्शन घेतले.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!