Thursday, April 25, 2024
Homeनगरजमीन घोटाळा; ठगांसमोर शासकीय यंत्रणा निष्प्रभ

जमीन घोटाळा; ठगांसमोर शासकीय यंत्रणा निष्प्रभ

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – बेलवंडी बुद्रुक येथील अंजनाबाई ढमढेरे ट्रस्टची जमीन बोगस व्यक्ती आणि कागदपत्रांच्या आधारे विक्री झाल्याचा गुन्हा दाखल झाला असताना यापूर्वीचे मांडवगणमध्ये देवस्थान इनाम वर्ग तीनची जमीन बोगस कागदपत्र बनवून नावावर केली. यात थेट दुय्यम निबंधक कार्यालयाचे बनावट शिक्के तर महसूल विभागाच्या नावाने बनावट आदेश तयार करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल झाला असला तरी याचे मुख्य सूत्रधार मोकाट आहेत.

याच टोळीने यापूर्वी श्रीगोंदा शहरासह चिखली, बेलवंडी, शिरसगाव, कोथूळ, ढोरजा, सुरेगाव यासह अनेक गावात अशा प्रकारे मालकांच्या परस्पर जमिनीचे बनावट कागदपत्र, तर अनेक ठिकाणी बनावट व्यक्तीना उभे करून जमिनी लाटल्या आहेत. ही मालिका सुरूच असताना या ठगांनी महसूल यंत्रणा हाताशी धरून अनेक कारनामे केले असताना पोलिसांना मुख्य सूत्रधारापर्यंत जाण्यात अद्याप यश आले नाही.

- Advertisement -

अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टचे विश्वस्त मृत असताना या जागी बनावट लोक उभे करून मृत ट्रस्टी जिवंत दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे ट्रस्टची बेलवंडी बुद्रुक येथील तीन एकर 9 गुंठे जमीन हडपल्याचा प्रकार समोर आला. या ट्रस्टचे सचिव चंद्रकांत काशीनाथ ढमढेरे यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन नायब तहसीलदार, तत्कालीन सबरजिस्टर यांच्यासह साक्षीदार, तत्कालीन तलाठी, मंडलाधिकारी अशा 24 जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यापूर्वी मांडवगण येथील उस्मान शहाबुद्दीन इनामदार यांच्या मालकीची असलेली देवस्थान इनाम वर्ग-3 ही शेत जमीन उस्मान मृत झाल्यानंतर गावातीलच बादशु इस्माईल शेख, रफिक इस्माईल शेख, हनिफ उर्फ हमीद शब्बीर शेख (तिघे राहणार मांडवगण) व मुनीर गुलाब शेख (राहणार श्रीगोंदे) यांनी बनावट मृत्यूपत्र व कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला. यात प्रांत कार्यालयाचे बनावट आदेश करण्यात आले आहेत.

मढेवडगाव येथील रंगा देवजी साळवे या शेतकर्‍याचा मृत्यू 50 वर्षापूर्वी झाला असताना त्यांच्या नावावर असलेली तीन एकर 14 आर शेतजमीन रंगा साळवे जिवंत असल्याचे दाखवून खोटे सातबारा उतारे व खोटे साक्षीदार उभे करुन विक्रीचा व्यवहार झाला. सुरेगावमधील जमीनही अशीच विकली. चिखली येथे बनावट महिला उभी करून जमीन विकली.

कोथूळ येथे पोलीस निरीक्षकांच्या पत्नीच्या नावावरील जमीन बनावट महिला उभी करून विकली. श्रीगोंदा शहरातील एका महिलेची जमीन परस्पर विकली. शिरसगावमध्ये असाच प्रकार घडला. गुन्हे दाखल झाले, काही आरोपी अटकही झाले; मात्र असे प्रकार करणारी टोळी आणि त्याचा सूत्रधार अद्यापही मोकाट आहेत.

श्रीगोंदा पोलीस स्टेशनला चार ते पाच गुन्हे दाखल झाले. बनावट कागदपत्र तयार करत थेट दुय्यम निबंधक कार्यालयाचीही फसवणूक करण्यात आली आहे. आपल्या जमिनीकडे न फिरकणार्‍या मालकांच्या जमिनीवरच डोळा असल्याचे एकूण परिस्थितीवरून लक्षात येत आहे.

‘व्हेग तक्रारी करू नका’
श्रीगोंदा दुय्ययम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करताना काळजी घेतली जात नाही. दलाल आणि मध्यस्थांचा वावर असल्याने जमिनीची परस्पर विक्री करणार्‍या टोळीचा बंदोबस्त होत नसल्याची तक्रार मुद्रांक व नोंदणी विभागाचे सहजिल्हा निबंधकांकडे केली असता त्यांनी व्हेग तक्रारी करू नका असे तक्रारदाराला लेखी देत सुनावले आहे. मात्र आता थेट तत्कालीन दुय्यम निबंधकांवरच गुन्हा दाखल झाल्याने ढिसाळ कारभार दिसत आहे.

सावधान वेळीच करा सातबारा चेक
तालुक्यातील अनेक गावात जमीन घोटाळे झाले आहेत. अस्तित्वात नसलेले जमीन उतारे तयार करून अदलाबदली जमीन प्रकरणे महसूल विभागातून मंजूर केली आहेत. जे जमीन मालक आपल्या शेताकडे येत नाहीत किंवा त्यांचे वारस नाहीत अशा जमिनी शोधून त्यांची परस्पर विक्री करणारी टोळी असल्याने आपले सातबारा आपल्याच नावावर आहेत का, हे पाहणे गरजेचे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या