Saturday, April 27, 2024
Homeनगरकुकाण्याचे तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय लॉकडाऊन !

कुकाण्याचे तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय लॉकडाऊन !

कामे खोळंबल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये संताप

कुकाणा (वार्ताहर)- करोनामुळे सरकारी यंत्रणा सतर्क असण्याची गरज असताना कुकाण्यातील मंडलाधिकारी व तलाठी कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन असून मंडलाधिकारी व तलाठी अनेक दिवसांपासून कुकाण्यातील या कार्यालयाकडे फिरकलेच नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. मंडलाधिकारी व तलाठी हे करोना दक्षता समितीशी संबंधित असतानाही त्यांना गांभीर्य दिसत नसल्याने या दोघांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

- Advertisement -

या कार्यालयात अय्या फुलमाळी मंडलाधिकारी तर प्रदीप चव्हाण तलाठी म्हणून कार्यरत आहेत. ग्रामस्तरावर सध्या करोना विषाणू प्रतिबंधासाठी व्यवस्थापनात मंडलाधिकारी व तलाठी यांची भूमिका अतिमहत्त्वाची असताना हे दोघेही कुकाण्यातील कार्यालयाकडे फिरकतच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंडलाधिकारी व तलाठ्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.

गावात बाहेरगावहून आलेल्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करणे, राहण्याची, जेवणाची व्यवस्था बघणे याबाबत नियोजन करण्यास मंडलाधिकारी व तलाठ्याअभावी अडचणी निर्माण होत आहेत. तर मंडल व तलाठी कार्यालयाशी संबंधित इतर सरकारी कामेही खोळंबून पडलेली आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून कुकाण्यातील मंडल कार्यालय कुलूपबंद स्थितीतच आहे.कुकाणे परिसरातील इतर ग्रामपंचायतींच्या सरपंचांनीही या कार्यालयाविषयी अशाच तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्या आहेत.

ग्रामस्तरावर जिल्हाधिकारी यांचे आदेशाने करोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन करण्यात आली असून त्यात तलाठी हेही सदस्य आहेत. असे असतानाही तलाठी व मंडलाधिकारी गायब आहेत. या दोघांवरही कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचेकडे सरपंच छाया गोर्डे यांचेसह आम्ही निवेदन पाठवून तक्रार केली आहे.
– अपूर्वा गर्जे, सदस्य ग्रामपंचायत व ग्रामसुरक्षा समिती.

कुकाण्यात मंडलाधिकारी कार्यालय सतत बंदच असते अशा ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. कुकाणा व परिसरातील नागरीकांची सरकारी कामेही यामुळे खोळंबली आहेत.करोनामुळे सरकारी यंत्रणा सतर्क होण्याऐवजी त्याकडे दूर्लक्ष करताना दिसत असल्याने जनतेत या कार्यालयाच्या कारभारासंबंधी संताप आहे.
– विठ्ठलराव अभंग, अध्यक्ष, समता पतसंस्था

तहसिलदारांच्या आदेशानुसार आमच्या नेमणूका नगर-औरंगाबाद मार्गावर प्रवरासंगम येथे निवारा केंद्रासाठी करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातून जात असलेल्या वाटसरूंच्या व्यवस्थापनासाठी माझी व तलाठी यांची नेमणूक आहे.
– अय्या फुलमाळी, मंडलाधिकारी, कुकाणा

- Advertisment -

ताज्या बातम्या