Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोपरगावच्या तरुणास 19 लाख 75 हजार रुपयांना घातला गंडा

Share
कोपरगावच्या तरुणास 19 लाख 75 हजार रुपयांना घातला गंडा, Latest News Kopargav Youth Froud

एमआरएफ टायर कंपनीची डिलरशिप मिळवून देतो म्हणून

कोपरगाव (प्रतिनिधी)- कोपरगाव शहरातील चांगल्या डीलरशिपच्या ऑनलाईन शोधात असलेल्या आशावादी तरुणाला एमआरएफ टायर कंपनीची डीलरशिप देतो, असे म्हणून गोड गोड बोलून त्याच्याकडून नोंदणी शुल्क, अनामत रक्कम, उत्पादन नोंदणी परवाना फी आदींच्या नावाखाली खोटी माहिती देऊन कंपनीचे बँक खाते असल्याचे सांगून त्या खात्यावर वेळोवेळी 19 लाख 75 हजार 800 रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगावातील द्वारकानगरी या उपनगरातील आशिष गवळी हा तरुण आपले शिक्षण घेता घेता व्यवसाय करण्यासाठी एका डिलरशिपच्या शोधात होता. त्याला ऑनलाईन एमआरएफ या टायर क्षेत्रातील नामांकित कंपनीची जाहिरात दिसल्याने तो हरकून गेला व त्याने त्या जाहिरातीत दिलेल्या तरुणांच्या संपर्कात आला. त्याने ती वेबसाईट उघडून त्यावरील भ्रमणध्वनिवरील (क्रं.9088975086) यावर संपर्क करून समोरील अमोल चव्हाण या व्यक्तीशी संपर्क साधला.

त्याने आपण एमआरएफ कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुम्हाला या कंपनीची डिलरशिप हवी असल्यास, आपणाला मी सांगेन त्या कंपनीच्या बँक खात्यावर पैसे जमा करावे लागतील. त्याप्रमाणे फिर्यादी तरुणाने नोंदणी शुल्क, अनामत रक्कम, उत्पादन नोंदणी परवाना फी आदींच्या नावाखाली खोटी माहिती देऊन खाते क्रमांक 3511101006440 व 3511101006437 त्यावर वेळोवेळी असे एकूण 19 लाख 75 हजार 800 रुपयांची रक्कम जमा केली. पैसे जमा केल्यावर त्याच्या वर्तनात लगेच फरक पडला. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे या तरुणाच्या लक्षात आले.

याप्रकरणी आशिष रामदास गवळी (वय 24) याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गु. र. नं. 65/2020 नुसार भा.द.वि.कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (डी) प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी भेट दिली असून हा गुन्हा नगर येथील सायबर गुन्हे शाखेकडे वर्ग करणार असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे हे करीत आहेत.

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणावर वाढीस लागले असून सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांच्या बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारत आहेत. डेबिट, क्रेडिट कार्ड बंद झाले आहे. ते पुन्हा चालू करायचे असल्यास कार्डची माहिती द्या किंवा ओटीपी नंबर सांगा. केवायसी अपडेट करणे, विम्याचे पैसे मिळवून देतो किंवा डीलर शिप मिळवून देतो, नोकरीचे आमिष आदी नाना लीला करून फुकटचा पैसा मिळवण्याचे शुक्लकाष्ठ सध्या वर्तमानात आशावादी तरुणांच्या मागे जोरात सुरु आहे.

तर काही आरोपी मॅट्रिमोनिअल वेबसाईटवर बनावट प्रोफाईल तयार करून गुन्हेगार हे महिलांना गंडा घालत आहेत. परदेशातून पाठवलेले गिफ्ट हवे असल्यास पैसे भरावे लागतील असेही आमिष दाखवून महिलांना फसवणुकीच्या जाळ्यात ओढले जात आहे. सायबर गुन्हेगार वेगवेगळी बँक खाती देतात आणि या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले जाते.

ज्यावेळी पोलीस बँक खात्याची चौकशी करतात. त्यावेळी ही खाती प्रमुख आरोपींची नसतात. ही खाती दुसर्‍याच व्यक्तींच्या नावाने असतात. त्यांना सायबर गुन्हेगारी काही प्रमाणात पैसे देऊन बँक खात्यांचा वापर करत असल्याची बाब चौकशीत पुढे आली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!