Thursday, May 9, 2024
Homeनगरकोपरगावात पहाटेपासूनच अघोषित संचारबंदी

कोपरगावात पहाटेपासूनच अघोषित संचारबंदी

कोरोनाचा सामना करण्यासाठी कोपरगावकर एकवटले; रस्ते, उद्याने, क्रिडांगणावर शुकशुकाट

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी कोपरगाव शहरात सकाळी सहा वाजताच सुरुवात झाली. सकाळी व्यायाम, मॉर्निंग वॉक व फिरायला येणार्‍या लोकांनी घराबाहेर येणे टाळले. दिवस उजाडताच रस्त्यावर, उद्यानात, महाविद्यालयाच्या मैदानावर होणारी गर्दी दिसून न आल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. त्यामुळे कोपरगाव शहरात पहाटे पासूनच अघोषित संचारबंदी सुरू झाली होती.

- Advertisement -

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत. त्यामुळे शुक्रवार दि. 20 मार्चपासूनच बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. मात्र आदेशानंतरही ज्यांनी दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागात जणू कालपासूनच लोकांनी बंद सुरू केला. कोपरगाव तालुक्यासह शहरात नागरिकांनी या जनता कर्फ्युचे काटेकोरपणे पालन केले असल्याचे दिसून आले आहे.

शहरात ठिकठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत असून नागरिकांना कोरोना विषाणू संसर्गजन्य आजाराविषयी जनजागरण करण्यासाठी तसेच घराबाहेर नागरिकांनी पडू नये यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या सूचनेनुसार कोपरगाव विभागातील तहसीलदार योगेश चन्द्रे, त्यांचे कर्मचारी, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर व तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सर्व पोलीस कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर तसेच कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी कर्मचारी यांची पथके नेमून सूचना देण्यात येत आहे.

रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही. कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे.

रविवार 22 मार्च रोजी जनता कर्फ्यु आत्मसंयम, देशहितासाठी कर्तव्य पालनचा संकल्पतेचा एक प्रतिक असेल, असं पंतप्रधान मोदींनी गुरुवारी आपल्या संबोधनात म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या आवाहनाला कोपरगावातील रिक्षा/टॅक्सी चालकांनी समर्थन दिलंय. कोपरगाव, शिर्डी, मनमाड, नगरसुल आणि शनिशिंगणापूर येथील रिक्षा चालकांनी जनता कर्फ्युला समर्थन देत रिक्षा/टॅक्सी चालकांनी घरीच राहण्याचा निर्णय घेतलाय. कोपरगाव येथील ऑटो रिक्षा संघटनेने रविवारी सेवा न देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच बस सेवा व रेल्वे देखील पूर्ण पणे बंद होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या