कोळपेवाडीच्या भोंदूबाबाचा संगमनेरात पर्दाफाश

jalgaon-digital
2 Min Read

‘अंनिस’ कार्यकर्त्यांमुळे गुन्हा दाखल, मल्याआप्पा पोलिसांच्या ताब्यात

संगमनेर (प्रतिनिधी)- संगमनेर तालुक्यातील चिखली येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भोंदू बाबाचा पर्दाफाश केला. या बाबाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.

‘अंनिस’चे कार्यकर्ते हरिभाऊ उगले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कोपरगावातील कोळपेवाडी येथील भोंदूबाबा मल्याआप्पा ठका कोळपे, याने या भागातील लोकांना माझ्या अंगात खंडोबा आहे. मी सगळ्यांच्या अडीअडचणींना उत्तरे देऊ शकतो असा प्रभाव पाडून पुजेच्या नावाखाली गोरगरीब जनतेकडून जादा पैसे उकळत होता. याबाबतची तक्रार अंनिसकडे आली होती. त्यावरून समितीने मला आणि संगमनेर तालुक्यातील प्रशांत पानसरे यांना माहिती घेण्यास सांगितले होते.

त्याप्रमाणे आम्ही कोळपेवाडीत माहिती घेतली असता अंनिसकडे आलेली तक्रार खरी असल्याचे दिसून आले. त्यानंतर आम्ही या भोंदूबाबा मल्याआप्पाच्या घरी गेलो. तेथे गेल्यावर माझी अडचण खोटी सांगितली. माझी गाय गाभण राहत नाही. माझ्या मुलाचे लग्न जमत नाही यावर उपाय काय असे विचारले. त्यावर या भोंदूबाबनने मला तुमच्या संगमनेरातील चिखली या गावी येऊन ग्रहांंची पुजा करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला 7 हजार रूपये आणि गाडीसाठी 3 हजार रूपये असे 10 हजार रूपयांचा खर्च सांगितला.

त्यानुसार 31 डिसेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता ठरल्याप्रमाणे मल्याआप्पा व त्याच्या बरोबर चांगदेव चिने (रा. पाथरे, सिन्नर) तसेच चालक असे लोक आम्ही दिलेल्या पत्ता कारभारी कोंडाजी हासे रा. चिखली येथे आले. अंनिसच्या अ‍ॅड. रंजना गवांदे, सुधीर नेहे, राहुल बांगर, काशिनाथ गुंजाळ असे लोक हजर झाले होतो.पण आम्ही अंनिसचे कार्यकर्ते आहोत हे या बाबाला समजू दिले नाही.

त्यानंतर मल्याआप्पा व त्याचा जोडीदार चांगदेव चिने यांनी माझे मेव्हणे कारभारी हासे यांच्या घरी पुजा सुरू केली. त्याचवेळी अ‍ॅड. गवांदे यांनी संगमनेर शहर पोलिसांना फोन करून याबाबतची सर्व माहिती दिली. याची दखल घेत पोहेकॉ गोरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी आले नी भोंदूबाबाने मांडलेली पुजा तसेच मल्याआप्पास ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *