Wednesday, April 24, 2024
Homeनगरटोमॅटो प्रश्नी शेतकर्‍यांना न्याय द्यावा किसान सभेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

टोमॅटो प्रश्नी शेतकर्‍यांना न्याय द्यावा किसान सभेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

अकोले (प्रतिनिधी)- टोमॅटो प्रश्नी शेतकर्‍यांना अचूक व समाधानकारक निदान उपलब्ध करावे व पिक नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. रोग निदानाबाबत प्राप्त झालेल्या रिपोर्टबाबतही निवेदनात, शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.

टॉमेटो, भाज्या व फळभाज्या या सारख्या सर्व नाशवंत पिकांना नैसर्गिक आपत्ती, रोगराई व दराबाबतचे चढ उतार यापासून संरक्षण मिळावे यासाठी विमा योजना सुरू करावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. शेतकर्‍यांनी खखकठ बेंगलोर या संस्थेला पाठविलेल्या नमुन्यांचे निष्कर्ष शेतकर्‍यांना प्राप्त झाले आहेत. यानुसार टोमॅटोवर कुंकूबर मोझॅक व्हायरस (सी.एम.व्ही.), टोबॅको व्हेन डिस्टॉर्शन व्हायरस (टी.बी.व्ही.डी.व्ही), ग्राऊंडनट बड नेक्रॉसीस व्हायरस व टोमॅटो मोझॅक व्हायरस हे 4 मुख्य विषाणूंचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. फळ परिपक्व होण्याच्या काळात तापमान वाढल्यामुळे, खतांचा व पोषकांचा अती वापर झाल्याने टॉमेटो पिकाचे नुकसान झाल्याचे सूचित करण्यात आले आहे. मात्र याबाबत शेतकरी सहमत नाहीत.

- Advertisement -

वरील विषाणूंचा संसर्ग टोमॅटो पिकात या पूर्वीही आढळलेला आहे. मात्र एकाच वेळी हा संसर्ग साथी सारखा चार जिल्ह्यात पसरल्याची बाब वेगळी आहे. संसर्गाचे साथ सदृश परिस्थितीत रूपांतर कशामुळे झाले हे या पार्श्वभूमीवर शोधणे आवश्यक आहे. प्राप्त रिपोर्टवरून या संसर्ग विस्ताराचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. वाढलेल्या तापमानामुळे विषाणू संसर्गाचे साथीत रूपांतर झाले असे सूचित करण्यात येत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी टॉमेटो उत्पादक पट्ट्यातील तापमान कमी राहिलेले आहे. शिवाय एकाच तालुक्यात विविध भौगोलिक पट्टयात तापमानात मोठी भिन्नता आहे. तापमान भिन्न असलेले चार जिल्ह्यातील विस्तृत क्षेत्र एकाच वेळी तापमानामुळे संसर्गाचे शिकार होणे संभवत नाही.

विषाणू संसर्गाचे वाहक असलेल्या पांढरी माशी, मावा कीड यासारख्या संसर्ग माध्यमांचा मोठा फैलाव कोठेही आढळला नाही. असे असताना हा संसर्ग जिल्ह्याच्या सीमा पार करून चार जिल्ह्यात कसा पोहचला याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. आगामी काळात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी ते आवश्यक आहे.

खतांचा किंवा पोषकांचा अतिरेक झाल्यास टोमॅटोमध्ये सेटिंग व्यवस्थित होत नाही हे शेतकर्‍याला माहित आहे. बहुतांश शेतकरी म्हणूनच माती परीक्षण करूनच खते व पोषके यांचा वापत करतात. त्यामुळे शेतकर्‍यांनी खतांचा किंवा पोषकांचा अतिरेकी वापर केल्याने नुकसान झाले हा युक्तिवादही पटत नाही. शिवाय टॉमेटो पिकाच्या या नुकसानीला बियाणांमधील दोष कारणीभूत आहे काय? या अंगाने चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवीन पीक घेताना कोणते बियाणे वापरावे, काय प्रतिबंधात्मक उपाय करावे याचे मार्गदर्शनही शेतकर्‍यांना होण्याची आवश्यकता आहे. शेतकर्‍यांच्या वरील शंकाही दूर होणे आवश्यक आहे. सरकारने या दृष्टीने पावले उचलावीत अशी विनंती डॉ. अशोक ढवळे,जे. पी. गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे व डॉ. अजित नवले यांनी निवेदनात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या