Thursday, April 25, 2024
Homeनगरखुणेगाव येथे आगीत राहाते छप्पर खाक

खुणेगाव येथे आगीत राहाते छप्पर खाक

कपडे, धान्य व संसारोपयोगी साहित्यासह रोख रक्कमही जळाली

नेवासा (का. प्रतिनिधी)- नेवासा तालुक्यातील खुणेगाव येथील पाटालगत असलेल्या वस्तीवर काल शुक्रवारी दुपारी 12 वाजता शेतमजूर कुटूंबाच्या राहत्या छपरास अचानक आग लागून धान्यासह संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. घरात ठेवलेल्या 30 ते 35 हजार रुपयांच्या रकमेच्या नोटा काही पूर्ण जळालेल्या तर काही अर्धवट जळालेल्या मिळून आल्या.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, खुणेगाव येथील वस्तीवर छप्पराच्या घरात राहत असलेल्या मंदाबाई संदीप मावस्कर या सकाळी नेहमीप्रमाणे मजुरीसाठी शेतावर कामाला गेल्या होत्या. त्यांचा मुलगा अनिकेत मावस्कर हा पेट्रोल पंपावर कामाला गेला होता. दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान अचानक छपरास आग लागून संसारोपयोगी सर्व साहित्य, भांडी, धान्य, कपडे व रोख रक्कम जळून खाक झाली.

आग लागलेली लक्षात येताच मंदाबाई संदीप मावस्कर यांना फोनवरून त्यांची जाऊबाई रेणुका अनिल मावस्कर यांनी ही माहिती दिली. मंदाबाई मावस्कर या घरी येईपर्यंत काकासाहेब कदम, काकासाहेब पोटे, बापू हारदे, राहुल हारदे, अभिषेक मावस्कर, आदित्य मावस्कर आदींनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु छपरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले.

घटनास्थळी पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार यांनी भेट देऊन मंदाबाई बावस्कर व अनिकेत मावस्कर यांचे सांत्वन करून शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नामदार शंकरराव गडाख यांचे मार्गदर्शनाखाली संसारोपयोगी भांडी व विविध वस्तू देण्याची ग्वाही दिली.

तहसीलदार रुपेश सुराणा यांनी सदर कुटुंबाला शासनाकडून धान्य व इतर स्वरूपाची मदत लवकरच देण्यात येईल मात्र तोपर्यंत स्थानिक गावकर्‍यांनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन भ्रमणध्वनीद्वारे केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या