Saturday, April 27, 2024
Homeनगरखारुताईच्या पिलांना लागला ‘प्रिया’ चा लळा

खारुताईच्या पिलांना लागला ‘प्रिया’ चा लळा

झाडावरून पडलेल्या पिल्लांना जीवदान देऊन जोडले मैत्रीचे नाते

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- नारळाच्या झाडावरून खाली पडलेल्या खारुताईच्या तीन पिलांना जीवदान देण्याचे काम प्रियाने केले. मात्र कळत न कळत या पिलांनाही प्रियाचा लळा लागला. या पिलांना पुन्हा निर्सगाच्या सान्निध्यात सोडून देण्याचा प्रयत्न प्रियाने केला. मात्र यातील दोन पिले नारळाच्या झाडावर खेळून पुन्हा प्रियाच्या मागे येत असल्याने मागील पंधरा दिवसांपासून प्रिया व खारूताईच्या पिलांचे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. प्राण्यांना प्रेम दिले तर तेही आपल्यावर प्रेमच करतात, किंबहुना माणसांपेक्षा जास्तच, याचा प्रत्यय खारूताईची पिले व प्रिया यांच्यातील मैत्रीतून दिसून येतो.

- Advertisement -

सध्या लॉकडाऊन असल्याने शाळांना सुट्टी आहे. त्यामुळे प्रिया नितीन सानप ही आपल्या बंगल्याच्या परसबागेतील नारळाच्या झाडाखाली खेळत होती. मात्र अचानक खारूताईचे तीन लहान पिल्ले नारळाच्या झाडावरून खाली पडली. त्यांना पळता येत नव्हते. ही गोष्ट प्रियाच्या लक्षात आली. अन् तिला या खारूताईंच्या पिल्लांबद्दल दया आली. त्यामुळे ती या तिन्हीही पिल्लांना घरात घेऊन गेली. त्यांना पाणी पाजले व काही वेळानंतर त्यांना दूधही पाजले. अगोदर ही पिले उंदराच्या पिलांसारखी दिसायची. मात्र या पिलांना काय खाऊ घालावे याबाबत प्रियाला फारशी माहिती नसल्याने तिने आपल्या आजोबांची मदत घेतली. सुरूवातीला या पिलांना पाणी मिश्रीत दूध तर नंतर थोडे ज्वारी बाजरीचे पीठ, द्राक्ष, कलिंगड खाऊ घालू लागली.

खारूताईचे ही पिल्ले ताजीतवानी झाल्यानंतर ते प्रियाच्या घरात तसेच अंगावर खेळू लागली. प्रिया खारुताईच्या पिल्लांचे मांजर व इतर पक्षांपासून संरक्षण करीत आहे. काही दिवसानंतर प्रियाने त्या पिल्लांना परत नारळाच्या झाडावर सोडले. मात्र यातील एक पिल्लू निघून गेले तर दोन पिल्ले झाडावर खेळून पुन्हा प्रियाच्या मागेमागे फिरत आहेत. गेल्या 15 दिवसांपासून खारुताईची पिल्ले व प्रिया हे एकमेकांसोबत घरात, परसबागेत खेळत आहेत. प्रियाने पिल्लांसाठी घरातच एक मोठी बादली व एक पुठ्ठ्याचा बॉक्स तयार केलेला आहे. त्या बॉक्समध्ये ती पिल्ले दिवसभर खेळत असतात. प्रियाही त्यांच्याबरोबरच खेेळत आनंद घेत आहे. दररोज ती या पिल्लांना ड्रॉपरने दूध पाजते. त्यामुळे या पिल्लांनाही प्रियाचा लळा लागला आहे. यातून तिचे मुक्या प्राण्यांबद्दल असलेले प्रेम दिसून येते.

कु. प्रिया नितीन सानप ही मोरगे वस्ती वॉर्ड नं. 7, श्रीरामपूर येथील रहिवाशी असून ती सेंट झेवियर इंग्लिश मीडियम स्कूमध्ये इयत्ता 4 थी मध्ये शिकत आहे. तिच्या वडिलांनाही पाळीव प्राण्यांचा छंद आहे. तिचे आजोबा श्रीरामपूर एज्युकेशन हायस्कूलचे सेवानिवृत्त प्राचार्य सोपानराव सानप हे तिला याबाबत मार्गदर्शन करत आहेत. खारूताईची पिल्ले मोठी झाल्यावर परत नारळाच्या झाडावर सोडून देण्याचा मनोदय प्रियाने व्यक्त केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या