काश्मीरात दोन दहशतवाद्यांसोबत पोलिस उपअधीक्षकाला अटक

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये पोलिस चेकिंगदरम्यान एका गाडीतून हिजबुल मुजाहिद्दीनच्या आसिफ राथर, सय्यद नवीद मुश्ताक ऊर्फ नवीद बाबू या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांसोबत गाडीत जम्मू-काश्मीरचे पोलिस उपअधीक्षक देविंदर सिंह होते. सुरक्षा दलांनी त्यांना सुद्धा अटक केली आहे. हे पोलिस उपअधीक्षक राष्ट्रपती पदक विजेता आहेत.

सध्या ते एअरपोर्ट सिक्युरिटीसाठी तैनात होते. नवीद बाबू हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर आहे. तर आसिफ राथर हा गेल्या तीन वर्षापूर्वी या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. हे दोघेही शोपियांमध्ये राहणारे आहेत.

देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी 15 ऑगस्टला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. ते जम्मू-काश्मीर पोलिसदलाच्या अँटी हायजॅकिंग स्क्वॉडमध्ये सामील होते. सध्या त्यांची ड्युटी श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर होती. याआधी 2001मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलिस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलिस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

अधिकार्‍यांनी सांगितले की, पोलिस उपअधीक्षक देविंदर सिंह हे दहशतवाद्यांना काश्मीर खोर्‍यातून बाहेर जाण्यासाठी मदत करत होते. त्यांच्या मदतीने दहशतवादी दिल्लीत येणार होते, असेही सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे, पोलिसउपअधीक्षकांच्या घरी छापेमारी केल्यानंतर 5 ग्रेनेड आणि 3 एके-47 सापडली आहे. पोलिस उपअधीक्षकांना दहशतवाद्यांसोबत अटक करण्याची मोहिम दक्षिण काश्मीरचे पोलिस उपमहासंचालक (डीआयजी) अतुल गोयल यांच्या नेतृत्वात करण्यात आली.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *