Wednesday, April 24, 2024
Homeनगरकर्जत-जामखेडचे विद्यार्थी घेणार ऑनलाईन शाळेचे धडे

कर्जत-जामखेडचे विद्यार्थी घेणार ऑनलाईन शाळेचे धडे

आ. रोहित पवारांचा पुढाकार : 5 शाळांमध्ये प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षणमंत्र्यांनी केला शुभारंभ

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे, यासाठी कर्जत व जामखेड तालुक्यात ऑनलाईन पध्दतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी आ. रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन ‘झोहो’ अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी डिजिटल स्कुलला सोमवार (दि.8) पासून सुरूवात केली.

- Advertisement -

या प्रणालीचे सोमवारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याहस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले आहे. याप्रसंगी झालेल्या वेबीनारमध्ये आ. रोहित पवार, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल पाटील, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, झोहो कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर बेंबू, संचालक देव आनंद, नगर जिल्ह्यात परिषदेच्या मुख्यालयातून अध्यक्ष राजश्रीताई घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांच्यासह कर्जत व जामखेडमधील पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या पाच शाळांतील शिक्षक व विद्यार्थी आदी हे शाळेतूनच ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

कर्जत व जामखेड तालुक्यातील एकूण 458 जिल्हा परिषदेच्या शाळा असून त्यामध्ये सुमारे 27 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी आ. पवार यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी झोहो कार्पोरेशनच्या माध्यमातून डिजिटल स्कूल्स ट्रान्सफॉर्मेशन ऑर परिवर्तन ही प्रणाली विकसीत केलेली आहे.

त्या माध्यमातून झोहो क्लासेस अ‍ॅण्ड ट्रान्सफार्मेशन करण्यात येणार आहे. या उपक्रमात कर्जतमधील रेहकुरी, खेड व महात्मा गांधी विद्यालय, जामखेडमधील पिंपरखेड व खर्डा या पाच शाळांची निवड करण्यात आलेली आहे. यातील चार शाळा जिल्हा परिषदेच्या तर एक शाळा रयत शिक्षण संस्थेची आहे.

नेटवर्कच्या अडचणींतून मार्ग काढावा लागेल : पवार
आ. रोहित पवार म्हणाले, कर्जत-जामखेडया दोन्ही तालुक्यातील मुलांचे शिक्षण मागे राहू नये, अशी इच्छा होती. शिक्षणाच्या बाबतीत कधीही या दोन तालुक्यांतील मुले मागे राहणार नाहीत व पायाभूत शिक्षणाबाबत नेहमी अग्रेसर राहतील. याचदृष्टीने आजवर विचार केला आणि त्यातूनच झोहो वर्गाची निर्मिती झाली आहे, ही संकल्पना जर इतर लोकप्रतिनिधींना आवडली, राज्य शासनाला आवडली तर इतरही ठिकाणी ती सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात मोबाईल व नेटवर्कच्या अडचणी असतील, मात्र त्यातूनही मार्ग काढावा लागेल, असे ते म्हणाले.

अशी आहे संकल्पना
कर्जत-जामखेडमधील सरकारी शाळांमधील मुलांचे शिक्षण मागे राहता कामा नये, यासाठी झोहो कार्पोरेशनच्या मदतीने व्हर्च्युअल अभ्यासक्रमाचा पर्याय शोधला. यामध्ये पालकांच्या मोबाईलची शाळेतील संबंधित वर्गाच्या शिक्षकांकडे नोंदणी करून त्या मुलांचा वर्ग सुरू होईल. शिक्षक त्या वर्गाचे म्हणजे ग्रुपचे अ‍ॅडमिन असतील आणि हे शिक्षक त्या वर्गातील मुलांना दररोज सकाळी अभ्यासक्रम पाठवतील. त्या अभ्यासक्रमानंतर दिलेला गृहपाठ दुसर्‍या दिवशी तपासतील. ठरलेल्या दिवशी त्याची परीक्षा देखील घेऊ शकतील, अशा प्रकारची ही नवी संकल्पना आहे. खासगी शाळांप्रमाणेच आधुनिक पध्दतीने येथील शिक्षक मोबाईलवर वर्ग चालवतील अन् मुलांच्या हजेरीपासून धडा गिरविण्यापर्यंत व गृहपाठापासून ते अगदी परीक्षेपर्यंत सारे काही शाळेसारखेच घडेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या