Monday, April 29, 2024
Homeनगरकर्जतचा जामखेडशी संपर्क तोडण्याची मागणी

कर्जतचा जामखेडशी संपर्क तोडण्याची मागणी

कर्जत (वार्ताहर)- कर्जत आणि जामखेड यांचा पूर्ण संपर्क तोडण्यात यावा, नगर-कर्जत संपर्काचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत तालुक्यास करोनाचा धोका संभवतो आहे. याची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, असी मागणी जोर धरू लागली आहे. कर्जत तालुक्याच्या सर्वात जवळचा तालुका जामखेड आहे. या दोन्ही तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. करोना आजाराने जामखेडमध्ये धुमाकूळ घातला आहे.

जिल्ह्यातील सर्वात जास्त 14 रुग्ण जामखेडला आढळले आहेत. संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. शेकडो लोकांना कॉरंटाईन केलेले आहे. अनेक परिसर हॉटस्पॉट करण्यात आले आहेत. एवढी गंभीर परिस्थिती जामखेडमध्ये निर्माण झालेली असतानाही आजही कर्जत आणि जामखेड तालुक्यातील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही. ही बाब गंभीर मानली जात आहे.

- Advertisement -

जामखेड तालुक्यामध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतरच लगेच या दोन्ही तालुक्याच्या सीमा पूर्णपणे बंद करण्याची गरज होती. दुर्दैवाने तसे झाले नाही. आजही चोंडी किंवा इतर मार्गाने कर्जत-जामखेडची वाहतूक सुरू आहे. यामुळे सर्वात मोठा धोका कर्जत तालुक्यामध्ये होऊ शकतो, असे मत व्यक्त करीत नागरिकांमध्ये घबराट आहे. प्रशासनाने यापूर्वीच गंभीरपणे याची दखल घेण्याची गरज होती.

करोना विषाणूंचा प्रसार सर्वत्र झपाट्याने होत असताना कर्जत तालुक्यांमध्ये मात्र अद्याप एकही रुग्ण आढळला नाही, ही तालुक्यासाठी मोठी समाधानाची बाब आहे. एक प्रकारे कर्जतकरांनी सध्या तरी करोनावर विजय मिळविल्याचे दिसूून येते. यामध्ये स्थानिक प्रशासन व नागरिक यांचे मोठे यश आहे, हे मान्य केले पाहिजे. परंतु यामुळे सर्वांची जबाबदारी आणखी वाढली आहे. ही परिस्थिती राखण्यासाठी प्रशासन व नागरिक यांनी आणखी प्रयत्न करण्याची गरज आहे.

कर्जतमध्ये मागील काही दिवसांपासून बाहेरच्या जिल्ह्यांमधून नागरिक येऊ लागले आहेत. याच प्रमाणे कर्जतकडे येणारे सर्व रस्ते खुले असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे बाहेरून सहज कोणीही तालुक्यात प्रवेश करीत आहे. ही बाब पोलीस प्रशासनासाठी आव्हान देणारी असून या घडणार्‍या घटना गंभीर आहेत. याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

कर्जत तालुका सुरक्षित ठेवायचा असेल तर कर्जतकडे बाहेरून येणारे सर्व रस्ते बंद करण्याची गरज आहे. याबाबत सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी तातडीने नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे. तसे न झाल्यास मोठी किंमत कर्जत तालुक्यातील जनतेला मोजावी लागेल, अशी भितीही व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यातील नागरिक मागील दीड महिन्यांपासून घरांत थांबून आहेत. त्यांची सहनशीलता संपू लागली आहे. ही बाब त्यांच्या जीवितास धोकादायक आहे. आणखी थोडे दिवस घरांमध्ये थांबल्यास कर्जत तालुका या जीवघेण्या आजारापासून मुक्त राहिल. यामुळे नागरिकांनी घरातच थांबण्याची गरज आहे आणि विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांवर कठोर कारवाईचीही गरज आहे. जामखेडकडे जाणारे रस्ते कधी सील होणार, याचीच कर्जतकरांना प्रतिक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या