Friday, April 26, 2024
Homeनगरपळालेल्या आरोपींच्या शोधासाठी सात पथके

पळालेल्या आरोपींच्या शोधासाठी सात पथके

खतरनाक आरोपी पळाल्याने जिल्हाभरात चर्चा : पोलीस महानिरीक्षकांची कर्जतला भेट

कर्जत (प्रतिनिधी) – येथील कारागृहामधून पळालेल्या पाच खतरनाक आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके रवाना करण्यात आली आहे. घटना घडून एक दिवस उलटला तरीही पोलिसांना पळालेल्या आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही. प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील कर्जत पोलीस ठाण्यात रविवारी रात्री पासून ठाण मांडून बसले आहेत. सोमवारी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी कारागृहास भेट देऊन पाहणी केली.

- Advertisement -

दोर्जे यांच्या भेटीच्यावेळी प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार छगन वाघ, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड उपस्थित होते. कारागृहामध्ये बंदिस्त असलेले आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत (दोघे रा. पारेवाडी ता. जामखेड), मोहन कुंडलिक भोरे (रा. कवडगाव ता. जामखेड), ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (रा. जवळा ता. जामखेड), गंगाधर लक्ष्मण जगताप (रा. म्हाळंगी ता. कर्जत) हे पाच आरोपी रविवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बराक क्रमांक चारमधून पळाले.

आरोपींनी पळून जाण्यासाठी कोठडीमधील छताचा प्लायवूडचा भाग कट केला. यानंतर त्याच्यावर असलेले जाड लोंखंडी गज कापले आणि नंतर कौले काढून बाहेर आले. शेजारी असलेल्या भिंतीवरून उड्या टाकून पळ काढला. पाच आरोपींनी पळ काढला त्या बराकीमध्ये सहा आरोपी होते. यापैकी पाच जण पळून गेले तर एक आरोपी मात्र पळाला नाही. न पळालेला आरोपी पूर्वाश्रमीचा पोलीस कर्मचारी असून त्याच्यावर वारकर्‍याच्या खुनाचा गुन्हा दाखल आहे. मात्र पाच आरोपी पळून गेलेल्या घटनेचा तो साक्षीदार आहे. या सर्व पाचही आरोपींचे छायाचित्र पोलिसांनी प्रकाशित केले आहेत. सर्व पोलीस ठाण्यांना ते पाठविण्यात आले आहेत.

विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट
सोमवारी दुपारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी कर्जत कारागृहाची पाहणी केली. कारागृहातून आरोपी कसे पळाले आहेत, याची आर्धा तास पाहणी दोर्जे यांनी केली. तसेच इतर आरोपींसोबत चर्चा केली. यानंतर त्यांनी कारागृहाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली. उपस्थित अधिकारर्‍यांसोबत चर्चा केली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड आणि इतर पोलीस अधिकारी यांची बैठक घेतली. त्यांना तपासाबाबात योग्य त्या सूचना दिल्या.

कसून शोध सुरू
या घटने नंतर कर्जतसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. रविवारी रात्रीपासून पोलीस पथके पसार आरोपींचा शोध घेत आहेत. कर्जत शहरातील बसस्थानक, समर्थ विद्यालय परिसर, बेल्हेकर कॉलनीसह अनेक भागामध्ये पोलीस फिरत होते. रात्रीच शहरासह जिल्ह्याबाहेर नाकाबंदी करण्यात आली होती. पळून गेलेल्या पाचही आरोपींवर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळालेल्या आरोपींना पकडण्यासाठी सात पोलीस पथके कार्यरत असून आरोपींचा कसून शोध सुरू असल्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या