Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कानिफनाथांच्या दर्शनासाठी मढी येथे भाविकांची गर्दी

Share
कानिफनाथांच्या दर्शनासाठी मढी येथे भाविकांची गर्दी, Latest News Kanifnath Yatra Darshan Madhi, pathardi

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – जगभर धुमाकूळ घातलेल्या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही भीती न बाळगता राज्याच्या विविध भागांतून आलेल्या हजारो भाविकांनी नाथांचा जयघोष करत चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. अस्तान्या (देवांच्या काठ्या) बसवणार्‍या भाविकांनी शेकडो वर्षाची परंपरा बाळगत काठ्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली. दुपारी एक वाजेपर्यंत मोठी गर्दी होती. दुपारनंतर मात्र गर्दी झपाट्याने कमी होऊन काहीसा शुकशुकाट जाणवला.

कोरोना रोगापासून जनतेचे रक्षण करा अशी प्रार्थना अनेक भाविकांनी चैतन्य कानिफनाथांच्या चरणी केली. दर्शन होताच रेवड्यांचा प्रसाद घेऊन भाविक माघारी फिरले. कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मढी यात्रेला भाविक फारसे येणार नाहीत या अंदाजाने प्रशासनाने यात्रेकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. बोटावर मोजण्या एवढ्या भाविकांशिवाय कोणीही सुरक्षा मास्क लावला नाही असे चित्र दिसले. श्री क्षेत्र पैठण येथील नाथषष्ठी यात्रेप्रमाणे येथे देखील पोलीस भाविकांनी माघारी पाठवतील म्हणून बर्‍याच जणांनी काल रात्री उशिरा नाथांचे दर्शन घेऊन मोहटादेवी गडावर मुक्काम केला. सुमारे दहा हजार देवांच्या काठ्या (अस्तान्या) नेहमीप्रमाणे आल्या होत्या. ठाणे, पुणे, नाशिक, बारामती, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. यात्रेनिमित्त मिठाईच्या दुकानात गर्दी दिसत होती.

मात्र दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी चार आणे सुद्धा यात्रा नाही. गिर्‍हाईक सुद्धा खूप कमी होते. दुपारीच बाजारपेठ ओस पडल्याचे जाणवत होते. आहे तो माल कसा विकायचा अशी चिंता लागल्याचे प्रमुख उत्पादक बाळासाहेब भोसले यांनी सांगितले. मढी यात्रेबरोबरच भाविक मायंबा वृद्धेश्वर येथेही जातात. कोल्हापुरी गुलालाच्या लाल रंगाची उधळण करत बेधुंदपणे डफ ताशाच्या तालावर नाचत भाविक मढीत दाखल झाले. एकेरी वाहतुकीचे नियोजन कोलमडल्याने मढी तिसगाव व मढी पाथर्डी रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी झाली. काठ्यांची मिरवणूक उत्तर दरवाजाने गडावर चढून कळसाला काठी टेकवण्याचा दक्षिण दरवाजाने बाहेर पडतात. दोन्ही बाजूच्या पायर्‍यावर भाविकांची काठ्याना स्पर्श करून दर्शन घेण्याची गर्दी वाढते. चैतन्य कानिफनाथांचा समाधी दिन म्हणून रंगपंचमीला नाथ भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे.

पैठण येथील नाथषष्ठी यात्रा प्रशासनाने रद्द केल्याने मढीची यात्रा सुद्धा रद्द झाली असेल असे समजून अनेक भाविक यात्रेपासून दूर राहिले. दरवर्षी सुमारे पाच लाख भाविक यात्रेसाठी येतात. यावर्षी लाखभर भाविक सुध्दा नव्हते. दुपारी चारनंतर तर मंदिर यात्रा परिसर मोकळा झाला. यात्रेनिमित्त खेळणी, मोरपीस, पूजा, साहित्याची सुद्धा विक्री घटली पारंपरिक खेळ म्हणून रहाटपाळणा घेणार्‍यांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आरोग्य विभागानेसुध्दा यात्रेचा अंदाज घेत दुपारनंतर आराम करण्याचे पसंत केले.

मंदिर परिसरात मोबाईल चोर, खिसेकापूंनी यात्रेकरूंना हात दाखवला. भाविकांना सर्वाधिक मनस्ताप वाहतूक कोंडीमुळे झाला. जगण्यामरण्याचा विषयापेक्षा श्रद्धा परंपरा याला महत्त्व देत कोरोनाच्या भीतीकडे दुर्लक्ष करत आलेल्या भाविकांनी अत्यंत उत्साहाने यात्रेत धार्मिक विधी पूर्ण केले. मढी येथील आंबराई परिसर शाळा परिसर विविध रस्त्यावर भाविकांनी मांडव धार्मिक विधी केले. पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील भाविकांच्या डफ व ढोल पथकाने यात्रेकरूंना खिळवून ठेवले. यात्रेनिमित्त ग्रामीण भागात लागणारी शेतीची औजारे, लोखंडाची भांडी, लाकडी साहित्य, वनऔषधी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले. यंदा प्राण्यांच्या विशेषत: डुकरांच्या केसांचा व्यापार सुद्धा झाला नाही.

दवणा वनस्पती नाडा व अन्य पूजासाहित्य सुद्धा फारसे विकले गेले नाही. सर्व प्रकारच्या व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणावर माल भरून मोठी गुंतवणूक केली. राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या कमी पडून महामंडळाने यंदा यात्रा शेडची उभारणी सुद्धा केली नाही. गरजूंना उन्हात ताटकळत उभे रहावे लागले. यात्रेचा शेवटचा टप्पा फुलोर बाग यात्रेने होईल. कावडीचा पाण्याने समाधीला जलाभिषेक होईल. नाथांच्या समाधीला सुगंधी उटणे लेपन करून महापूजेने यात्रेची सांगता होईल. यात्रेनिमित्त लोकनाट्य तमाशा मंडळाची मात्र चांदी झाली. तमाशाच्या फडात मात्र गर्दीला कमतरता नव्हती.

नाथसंप्रदायात भाविकांची सेवा करणे हे मोठे पुण्य समजले जाते. पनवेलच्या भाविकांनी यात्रेत सर्व भाविकांना मोफत बिसलेरी बाटल्याचे वाटप केले. यामुळे उन्हाने त्रस्त झालेल्या भाविकांची खूप सोय झाली. बस स्टँड परिसरात महाप्रसादाचे वाटप भाविकांनी केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!