कचरेंच्या सत्तेचा चौकार !

jalgaon-digital
3 Min Read

माध्यमिक सोसायटी निवडणूक, विरोधकांना केवळ 4 जागा

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची कामधेनू असणार्‍या माध्यमिक शिक्षक सोसायटी निवडणुकीत भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी पुरोगामी आघाडीने चौथ्यांदा सत्ता हस्तगत केली आहे. गत वर्षीच्या तुलनेत या मंडळाची कामगिरी सरस झाली आहे. विशेष म्हणजे कचरे पाचव्यांदा निवडून आले असून त्यांनी यावेळी सहा संचालकांना पुन्हा संधी दिली होती. ते सर्व संचालक निवडून आले आहेत. या मंडळाच्या विजयाने एकप्रकारे सभासदांनी कचरेंच्या कारभारावर शिक्कामोर्तब केले आहे.

सत्ताधारी पुरोगामी मंडळाचे 17 तर परिवर्तन आघाडीचे 4 उमेदवार विजयी झाले. तर तिसर्‍या आघाडीला खातेही खोलता आले नाही. मतमोजणीचा निकाल हाती येताच सत्ताधारी पुरोगामी आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. या निवडणुकीत पुरोगामी मंडळाचे भाऊसाहेब कचरे यांना सर्वाधिक 5328 मते मिळाली तर विरोधी परिवर्तन मंडळाचे आप्पासाहेब शिंदे यांना दुसर्‍या क्रमांकाची 5100 मते मिळाली.
माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या 22 जागांसाठी सोमवारी सकाळी 8 वा. ओम गार्डन मंगल कार्यालय येथे मतमोजणी पार पडली. 10 हजार 302 मतदारांपैकी 9 हजार 246 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत प्रा. भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी सहकार आघाडी, आप्पासाहेब शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वा खालील परिवर्तन आघाडी तर सुनील पंडित यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा आघाडी रिंगणात उतरली होती. जिल्ह्यात एकूण 89.74टक्के मतदान झाले.

तिसर्‍या पॅनलचा परिवर्तनला फटका
तिरंगी लढतीमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली. मागील निवडणुकीत 1 ते 20 मतांच्या फरकाने परिवर्तनचे सहा उमेदवार पराभूत झाले होते. यावेळी वाढत्या मतदानाचा तसेच तसेच तिसर्‍या आघाडीचा फटका परिवर्तन मंडळाला चांगला फटका बसला असून परिवर्तन पॅनलला अवघ्या चार जागा मिळाल्या.

मतमोजणी साठी अतिरिक्त 30 टेबल
गेल्या निवडणुकीच्या वेळी मतमोजणी करताना रात्रीचे बारा वाजले होते. त्यामुळे गेल्या वेळच्या परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी रत्नाळे यांनी यावेळेस अतिरिक्त 30 टेबल मतमोजणी साठी वाढविले. यामुळे यावेळी सुटसुटीत मतमोजणी झाली.

690 मते झाली बाद
यावेळी प्रथमच विक्रमी 64 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे मतपत्रिका मोठी झाली होती. त्यामुळे बाद मतांचे प्रमाण 690 वर गेले. यात सर्वसाधारण मध्ये 409 मते बाद झाली, अनुसूचित जाती जमती मध्ये 92, वीजभज विमाप्र मध्ये 68, महिला राखीव मध्ये 67, तर इमाव मध्ये 54 मते बाद झाली.

मुस्लिम उमेदवाराचा फायदा
कचरे यांनी पाथर्डीत फकिर दिलावर चांदभाई या मुस्लिम उमेदवार दिला होता. या उमेदवाराचा 105 मतांनी पराभव झाला. पण या भागातून कचरे गटाच्या अन्य उमेदवारांचा विजय झाला. या मस्लिम उमेदवाराचा कचरे पॅनेलला फायदा झाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना स्विकृत संचालक म्हणून घ्यावे, अशी मागणी होत आहे.

विजयी उमेदवार
पुरोगामी सर्वसाधारण-प्रा.भाऊसाहेब कचरे (5358),दिलीप काटे (4576),ज्ञानेश्वर काळे(4483),संजय कोळसे(4377),चांगदेव खेमनर(4679),अनिल गायकर(4248),काकासाहेब घुले(4456),अशोक ठुबे(4418),सुर्यकांत डावखर(4387),अण्णासाहेब ढगे(4135),सत्यवान थोरे(4304),धनंजय म्हस्के(4712),सुरेश मिसाळ (4404),कैलास राहणे(4164),महिला -आशा कराळे (4785),मनीषा म्हस्के(4583)-अनुसूचित-धोंडीबा राक्षे (4384)
परिवर्तन -सर्वसाधारण -आप्पासाहेब शिंदे (5100),बाबासाहेब बोडखे (4200),ओबीसी-महेंद्र हिंगे (4752), भटक्या विमुक्त-वसंत खेडकर(4384).

सर्वसामान्य सभासदांचा हा विजय –
माध्यमिक सोसायटीची निवडणुक यावेळी प्रतिष्ठेची झाली. बावीस वर्षांपासून सभासद आमच्यावर विश्वास टाकत होते, ते यावेळी थोडेसे सुद्धा डळमळीत झाले नाही. हा विजय सर्वसामान्य कर्जदार सभासदांचा असून यापुढेही आमची नाळ सर्वसामान्य शिक्षकांशी जोडलेली राहिल.
-भाऊसाहेब कचरे (पुरोगामी मंडळ)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *