Wednesday, April 24, 2024
Homeनगरजामखेड : जमिनीच्या वादातून युवकाचा खून

जामखेड : जमिनीच्या वादातून युवकाचा खून

साकत येथील घटना : परस्परविरोधी गुन्हे दाखल

जामखेड (तालुका प्रतिनिधी)-  जमिनीच्या वादातून जामखेड तालुक्यातील साकत येथे दोन गटांत लाकडी दांडके व दगडाने झालेल्या तुंबळ हाणामारीत एकाचा मुत्यू झाला आहे. दोन्ही गटाकडील एकूण चार जण जखमी झाले असून परस्परविरोधी दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अमोल अशोक वराट (वय 22, साकत) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की फिर्यादीचे वडील अशोक वराट यांनी जमीन मोजून घेण्याचा प्रस्ताव मांडल्याने त्याचा राग आरोपींना आला व 16 मे रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास साकत गावातील फिर्यादीच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमा करून लाकडी दांडके, दगड, काठ्याने फिर्यादी व त्याच्या वडिलांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यामध्ये जीवे मारण्याच्या उद्देशाने आरोपी अजय वराट व विजय वराट यांनी ओमकार वराट याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारल्याने तो बेशुद्ध पडला. फिर्यादीने नातेवाईकांच्या मदतीने ओमकारला उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. मात्र दि. 23 मे रोजी सकाळी 7.45 वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताचा भाऊ अमोल अशोक वराट यांच्या फिर्यादीवरून आरोपी किरण नागनाथ वराट, अजय किरण वराट, विजय किरण वराट, सुदाम किरण वराट, उद्धव नागनाथ वराट, विनोद उद्धव वराट, बाळु उद्धव वराट (सर्व रा. साकत, ता. जामखेड) अशा सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील करत आहेत. यातील किरण नागनाथ वराट, उद्धव नागनाथ वराट, विनोद उद्धव वराट, बाळू उर्फ गणेश वराट यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दुसर्‍या फिर्यादीत अजय किरण वराट (वय 17, रा. साकत) याने म्हटले आहे की, मी शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी जात आसताना आरोपीने फिर्यादीची मोटारसायकल अडवून ‘तू मोटार चालू करण्यासाठी टाकलेली वायर का तोडली’ असे म्हणत आरोपी बाजीराव वराट याने खाली पडलेला दगड जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखम केली. इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.

यानुसार अशोक कुंडलीक वराट, बाजीराव अशोक वराट, अमोल अशोक वराट व ओमकार अशोक वराट (मयत) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करत आहेत. यातील अशोक कुंडलीक वराट, अमोल अशोक वराट, बाजीराव अशोक वराट यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या