Monday, April 29, 2024
Homeनगरजामखेड : काळ्या बाजारात चाललेला 24 टन तांदूळ पकडला

जामखेड : काळ्या बाजारात चाललेला 24 टन तांदूळ पकडला

जामखेड तालुक्यातील घटना : सोनेगाव स्वस्त धान्य दुकानातील धान्यन्य दुकानदार बाबत संशय निर्माण झाला आहे.

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदळाची ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात पोलीसांनी पकडला. याबाबत पोलिसांनी ट्रक चालकासह दोघांना अटक केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी आ. रोहित पवार यांनी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानात छापा टाकून मोठ्या प्रमाणावर धान्य साठा हस्तगत केला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. 28) पुन्हा 24 टन तांदूळ पकडल्याने तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संशयाच्या भोवर्‍यात असल्याचे भासत आहे.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी, की पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील 24 टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी नान्नज, चोंडी, चापडगाव मार्गे जाणार असल्याची माहिती मिळाली. या खबरीवरून सातव यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक रवाना केले.

दुपारी तीनच्या सुमारास जामखेड तालुक्यातील चोंडी शिवारात तांदळाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच 45 टी 7396) आला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस नाईक केशव व्हटकरे, भरत गडकर, आण्णासाहेब कोळेकर, संतोष साबळे, हृदय घोडके, आदित्य बेलेकर, सागर जंगम, लहु खरात यांच्या पथकाने ट्रक अडवला.

ट्रक चालक शशिकांत भिमराव गवळी (रा. कुर्डूवाडी, ता. माढा जि. सोलापूर) व त्याचा सहकारी संदीप सुनील लोंढे (रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हा तांदूळ सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान चालक मंदा सुग्रीव वायकर यांचा असून तो गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांनी याबाबत तालुका पुरवठा अधिकारी व कर्मचार्‍यांना बोलावून तपासणी केली असता तांदूळ सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील असल्याचे निष्पन्न झाले.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेला सरकार धान्य देत असताना दुकान चालक त्याचे वाटप न करता गुजरातमध्ये काळ्या बाजारात विकून पैसे कमावण्याचा धंदा करीत आहेत. आ. रोहित पवार यांनी पंधरा दिवसांपूर्वी राजुरी येथील स्वस्त धान्य दुकानावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर तांदूळ, गहू साखरेचा साठा हस्तगत करून दुकानाचा परवाना निलंबित केला होता. त्यानंतर पुन्हा गुरुवारी रेशनिंगचा 24 टन तांदूळ पकडल्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांबाबत संशय निर्माण झाला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपधीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या