Wednesday, April 24, 2024
Homeनगरजामखेड तालुक्यात 9685 नागरिकांना होम क्वारंटाइनचा शिक्का

जामखेड तालुक्यात 9685 नागरिकांना होम क्वारंटाइनचा शिक्का

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर पुणे, मुंबई तसेच इतर राज्यात उदरनिर्वाहासाठी गेलेले जामखेड तालुक्यातील नागरिक पुन्हा गावाकडे परतली आहेत. त्यांची तपासणी आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. ग्रामीण भागासह तालुक्यातील 10 हजार 685 नागरिक परत आले आहेत. यापैकी 9 हजार 685 नागरिकांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारले आहेत. पोलीस पाटलांमार्फत या नागरिकांवर लक्ष ठेवले जात आहे.

जामखेड तालुका कायमस्वरूपी दुष्काळी भाग आहे. पावसावर अवलंबून शेती असल्याचे उत्पन्नाचे हमखास स्त्रोत नाही. त्यामुळे जामखेड, दिघोळ, जातेगाव, साकत, खर्डा, पिंपरखेड, नान्नज, जवळा, सोनेगाव, धनेगाव, अरणगाव, पाटोदा, हळगाव पिंपळगाव उंडा या परिसरातून नागरिक उदरनिर्वाहासाठी व विद्यार्थी शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबई, सुरत, इंदौर, भिवंडी, नाशिक, नगर येथे जातात. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने या स्थलांतरित कुटुंबियांचा मोर्चा पुन्हा जामखेड तालुक्याकडे वळला आहे.

- Advertisement -

ग्रामीण व शहरी भागात स्थलांतरित नागरिकांचा लोंढा पुन्हा तालुक्यात येऊ लागल्याने कोरोना विषाणूचा सामाजिक फैलाव होण्याचा धोका वाढला. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात बाहेरगावावरून आलेल्या नागरिकांवर संशय व्यक्त केला जात आहे. अनेक गावात याबाबत विरोधाचे सूर उमटले होते. ग्रामस्थांनी आरोग्य विभागाकडे या नागरिकांची तपासणी करण्याची मागणी केली.

आठ दिवसांपासून महसूल, पंचायत समिती, पोलीस, तालुका आरोग्य विभाग अंग झटकून कामाला लागले. आरोग्य सेविका, आशा स्वंयसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक यांनी घरोघरी जाऊन बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांचा शोध घेतला. त्यांच्याकडे जाऊन ते कोठून आले, कोणत्या भागात राहत होते, नौकरी व्यवसाय काय होता, कोणत्या लोकांच्या संपर्कात येत होतात आदी माहिती घेतली जात आहे.

शिवाय त्यांच्यात सर्दी, खोकला यासारखी काही लक्षणे दिसून येतात का, याचे निरीक्षण केले जात आहे. काही संशयास्पद लक्षणे असतील तर त्यांना तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवले जात आहे. व्यवस्थित वाटले तर त्यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारून 14 दिवस घरातच वेगळे राहण्याचा सल्ला दिला जात आहे. काही गावात बाहेर गावाहून आलेल्यांची माहिती दिली जात नाही. माहिती देण्यासाठी नागरिक घाबरत असल्याने त्यासाठी पुढे येत नाहीत. आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती घेत आहेत.

काही ठिकाणी आरोग्य विभागाच्या सेविका किंवा कर्मचारी दिसताच महिला घराचे दरवाजे बंद करून घरातच थांबतात. आरोग्य कर्मचारी तेथून जात नाही तो पर्यंत महिलांसह कोणीही बाहेर येत नाहीत. काही ठिकाणी दहाजण बाहेरगावहून आले असतील, तर तिथे चार ते पाच लोंकाची माहिती दिली जाते. अनेक ठिकाणी माहिती अजूनही दिली जात नाही. जामखेड तालुक्यात बाहेर गावाहून किंवा परराज्यातून कोणी आले असतील तर जवळच्या आरोग्य केंद्रात माहिती देण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे यांनी केले आहे.

जामखेड तालुक्यात आलेल्या नागरिकांची संख्या 10 हजार 685 आहे. त्यातील 9 हजार 685 नागरिकांच्या हातावर शिक्के मारले आहेत. या नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये म्हणून पोलीस पाटील व कोतवालांच्या माध्यमातून त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. यातील काही लोक घराबाहेर पडले तर तात्काळ पोलिसांना कळवले जात आहे. शहर व ग्रामीण भागात अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे त्यांच्यावर पाच ते सहा गावांची जबाबदारी देण्यात आली आहे.

पोलीस, तलाठी, ग्रामसेवक, होमगार्ड, यांची गावोगाव नियुक्ती झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, व्यापार बंद करण्यात आला आहे.
शहरात असलेल्या या क्वारंटाइन नागरिकांचा पोलीस दररोज घरी जाऊन क्वारंटाइन पाळला जातो की नाही याची तपासणी करित आहे. शहरात एका ठिकाणी परदेशातून आलेले 14 नागरीकांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर बांबू आडवे लावून रस्ते लॉक केली आहेत त्याप्रमाणे जंतूनाशक फवारणी करून ग्रामीण व शहरी भाग निर्जंतुक केला जात आहे.

नागरीकांची गर्दी टाळण्यासाठी पोलीस प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. सर्व प्रशासन कोरोना विशाषूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातात हात घालून काम करत आहेत त्यासाठी नागरिकांनी प्रशासन यांना सहकार्य करण्याचे भावना व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिकांनीही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या