Saturday, April 27, 2024
Homeनगरजामखेडचे आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह

जामखेडचे आणखी दोघे कोरोना पॉझिटिव्ह

लोणी, मुकुंदनगरच्या दोघा कोरोनामुक्तांना डिस्चार्ज
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे मंगळवारी पाठविलेल्या अहवालापैकी दोन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. हे दोघे जामखेड शहरातील आहेत. काही दिवसापूर्वी जामखेडमध्ये मृत्यू पावलेल्या रुग्णाची दोन्ही मुले कोरोना बाधीत झाली होती. त्यांच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या या दोन युवकांना आता लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील बाधीतांची संख्या आता 33 झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील बाधीतांपैकी 20 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. बुधवारी दोघे कोरामुक्त मुक्त झाल्याचा अहवाल आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असून त्यांना आता तालुका पातळीवर संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात लोणी (ता. राहाता) आणि मुकुंदनगर (नगर शहर) येथील दोन कोरोना बाधितांचा 14 दिवसानंतर दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी बूथ हॉस्पीटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. काल दुपारी त्यांना बूथ हॉस्पिटल मधून हॉस्पिटल देखरेखीखाली लोणी आणि नगर शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.या दोन्ही रुग्णांची तब्बेत चांगली असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांपैकी 20 रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोपरगाव येथील एक व जामखेड येथील एक अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथील बूथ हॉस्पिटलमध्ये 9 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नेवासा येथील दोन, जामखेड येथील दोन, आलमगीर (ता.नगर) येथील तीन, आष्टी (जि.बीड) येथील एक व आयव्हरी कोस्ट येथील एक परदेशी नागरिक यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात बारा मार्चला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर मार्चचा शेवटचा आणि एप्रिलचा पहिला आठवडा रुग्ण वाढीचा ठरला. आरोग्य विभागतर्फे नागरी आणि ग्रामीण अशी विभागणी करण्यात आलेली आहे. नगर तालुक्याच्या विचार करता महानगरपालिका हद्द व तालुक्यातील आलमगीर येथे मिळून आतापर्यंत 11 रुग्ण आढळले असून यापैकी 8 जण बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिला आहे. तर, तीन जणांवर उपचार सुरू आहेत.
जामखेड येथील एका व्यक्तीचा काही दिवसापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, त्याचा अहवाल आला नसल्याने त्याचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला नव्हता. त्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियातील सर्वांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात होते. त्यात त्याचे 29 आणि 35 वर्षीय मुलगे बाधीत असल्याचे आढळून आले. या मुलांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यात या व्यक्ती बाधीत असल्याचे आढळून आले.
- Advertisment -

ताज्या बातम्या