Friday, April 26, 2024
Homeनगरजलयुक्त शिवार योजनेत 17 लाख 69 हजारांचा अपहार

जलयुक्त शिवार योजनेत 17 लाख 69 हजारांचा अपहार

मजले चिंचोलीच्या तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

अहमदनगर (वार्ताहर) – राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे काम मंaजूर झाल्यानंतर जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने बँकेत खाते उघडून त्याचा हिशोब न ठेवता खात्यातून तब्बल 17 लाख 69 हजार 456 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी नगर तालुक्यातील मजले चिंचोलीचे तत्कालीन उपसरपंच आणि ग्रामसेवकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्‍हाट असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत नगर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठकाराम मुरलीधर तुपे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. 1 जानेवारी 2016 ते 1 डिसेंबर 2018 या कालावधीत मजले चिंचोलीचे उपसरपंच असलेले धर्मनाथ आनंदा आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत पोपट जर्‍हाट यांनी संगनमताने जेऊर येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जलयुक्त शिवार संकलन निधी नावाने संयुक्त खाते उघडले.

त्याचा हिशोब न ठेवता खात्यातून तब्बल 17 लाख 69 हजार 456 रुपयांचा अपहार केला. तसेच पाणीपट्टी वसुलीचे बेकायदेशीर खाते उघडून त्यातूनही 1 लाख 58 हजार 530 रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारीची चौकशी केली असता अपहार झाल्याचे उघडकीस आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधोर करीत आहेत.

दहा दिवसांत दुसरा गुन्हा
नगर तालुक्यातील मजले चिंचोली ग्रामपंचायतीमध्ये महिला सरपंचाच्या बोगस सह्या करून सुमारे 57 लाख रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी धर्मनाथ आव्हाड व श्रीकांत जर्‍हाट एमआयडीसी यांच्यावर तत्कालीन सरपंच गीतांजली आव्हाड यांच्या फिर्यादीवरून 25 जानेवारीला गुन्हा दाखल झालेला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत या दोघांविरूद्ध फसवणुकीचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या