Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

तुम्ही जसे एक झालात तसे कार्यकर्त्यांनाही एकत्र यायला सांगा!

Share
तुम्ही जसे एक झालात तसे कार्यकर्त्यांनाही एकत्र यायला सांगा !, latest News Indorikar Maharaj Statement Jorve

इंदुरीकर महाराजांचा राज्यकर्त्यांना सल्ला

जोर्वे (वार्ताहर)- ‘राजकारण्यांनी जसा तान्हाजी सिनेमा एका थिएटरात बसून एकत्र पाहिला, तसेच तुमच्या कार्यकर्त्यांना गावात एकत्र बसायला सांगा’, असा सल्ला निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी राज्यकर्त्यांना दिला. इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार आहेत, इंदुरीकर महाराज हे त्यांच्या कीर्तनाच्या मजेदार शैलीसाठी ओळखले जातात. कालच्या कार्यक्रमात त्यांनी राजकारणाच्या स्थानिक पातळीवर होणार्‍या परिणामांवर परखड व मार्मिक भाष्य केले. याची दिवसभर चर्चा सुरू होती.

संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे आयोजित कार्यक्रमात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते.

आपल्या खास शैलीतून समाजप्रबोधनाचे काम करणारे, हसता हसता चुकांवर नेमके बोट ठेवणारे, अंधश्रध्देवर प्रहार करुन, शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी सक्रीय प्रयत्न करणारे महाराज समाजात प्रेम आपुलकी, एकोपा निर्माण करीत आहेत. मनातील द्वेषाची जळमटे दूर करण्याचे व केवळ उपदेश करून नाही, तर प्रत्यक्ष अनाथ, गरजू मुलांसाठी शिक्षण व निवासाची सोय इंदुरीकर महारांनी केली आहे. ही आपणासाठी मोठी अभिमानाची गोष्ट असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

इंदुरीकर महाराज राजकारणही गाजवतील- विखे
राजकारण्याचे बोर्ड कमी झाले आणि महाराजांचे वाढले याकडे लक्ष वेधत विखे म्हणाले की, आता कोणताच कार्यक्रम इंदोरीकर महाराजांशिवाय होऊ शकत नाही. एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली. याचे कारण समाजाचे प्रबोधन करण्याची वैचारीक शक्ती त्यांच्याकडे आहे. त्यामुळेच समाजात एक अधिकार त्यांनी मिळविला असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून उद्या ते राजकारणात आलेच तर त्यांच्याकडे असलेल्या प्रबोधनाच्या गुणांमुळे राजकारणातही अधिकार गाजविल्याशिवाय राहाणार नाहीत असेही ते म्हणाले.

रोहित व डॉ. सुजय यांच्यात आजोबांचे गुण
माझे विखे आणि थोरात घराण्यांवर सारखेच प्रेम आहे. मी ज्येष्ठ नेते शरद पवारांना देव मानणारा माणूस आहे. आणि हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दिवंगत बाळासाहेब विखे यांचे सर्व गुण खासदार डॉ. सुजय विखे यांच्याकडे आले आहेत. तर शरद पवारांचे सर्व गुण आमदार रोहित पवारांनी घेतले आहेत, असे निरीक्षणही इंदुरीकर यांनी नोंदवले.

सत्यजित, तुलाही भविष्यात मतदारसंघ शोधून द्यावा लागेल..
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी आपल्या भाषणात विधानसभा निवडणुकीत इंदुरीकर महाराजांच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चेचा उल्लेख केला. आम्ही थोडे धास्तावलो होतो असे त्यांनी कबुल केले. तोच धागा पकडत आ. राधाकृष्ण विखे म्हणाले की, इंदुरीकर महाराजांच्या उमेदवारीची आम्हाला अपेक्षा होती; पण आम्ही आग्रह धरला नव्हता, सत्यजित आम्ही शक्य असेल तिथेच आग्रह धरतो असे स्पष्ट करत भविष्यात तुलाही मतदारसंघ शोधून द्यावा लागेल, असा सूचक टोला लगावला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!