Tuesday, April 23, 2024
Homeअहमदनगरइंदोरीकर महाराजांचं नोटिशीला उत्तर

इंदोरीकर महाराजांचं नोटिशीला उत्तर

अहमदनगर (प्रतिनिधी)- ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य करून गोत्यात अडकलेले निवृती महाराज देशमुख यांनी नोटिशीला उत्तर दिलं आहे. अखेरच्या दिवशी त्यांनी हे उत्तर पाठवलं आहे. पण यावर काहीही बोलण्यास जिल्हा रुग्णालयाच्यावतीने नकार दिला आहे.

लिंग भेदभाव करणार्‍या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. काल सुट्टी असल्यामुळे खुलासा येतो की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर इंदोरीकर महाराजांचे वकील अ‍ॅड. शिवलीकर हे एका सेवकासमवेत दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी तेथील अधिकार्‍यांशी फोनवरून संपर्क केला, त्यावेळी त्यांना रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांकडे तुम्ही खुलासा सादर करा, असे सांगितले.

- Advertisement -

त्यानंतर अपघात कक्ष विभागामध्ये कार्यरत असलेल्या डॉ. एस. जी. ढाकणे यांच्याकडे खुलासा सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे महाराजांच्या वकिलांनी हा खुलासा दिल्यानंतर संबंधित अधिकार्‍याची सही व शिक्का घेतला. त्याचवेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना खुलाशाबाबत विचारणा केली. त्यावर त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. दोन दिवसांमध्ये महाराज स्वतः भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे यावेळी माध्यमांना चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.दरम्यान, इंदोरीकरांच्या वक्तव्यावरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे, तर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या