Friday, April 26, 2024
Homeनगरइंदोरीकरांच्या समर्थनार्थ अनेकजण सरसावले

इंदोरीकरांच्या समर्थनार्थ अनेकजण सरसावले

मोशीत जंगी मिरवणूक, बीडमध्ये प्रतिमेला दुग्ध अभिषेक

अहमदनगर (प्रतिनिधी)- ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर काही ठिकाणी टीका होत आहे तर काही ठिकाणी पाठिंबा मिळत आहे. अशामध्ये त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ दोन गट पडल्याचे दिसून येत आहेत.

- Advertisement -

पिंपरीमध्ये नुकतीच इंदोरीकर यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात आली. बीडमध्ये त्यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. दरम्यान, सम-विषम तिथीवरून मुलगा-मुलगीबाबत भाष्य करून वादात अडकलेल्या इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम काल पुण्यात झाला. शिवजयंती महोत्सवानिमित्त मोशी गावात निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मोशी ग्रामस्थांनी इंदोरीकर महाराजांची गावाच्या वेशीपासून बैलगाडीतून वाजत-गाजत मिरवणूक काढली. यावेळी इंदोरीकर महाराजांनी शिवजयंतीनिमित्त खास सल्ला दिला. शिवजयंतीला संकल्प करा की एखाद्या माणसाचा मृत्यू झाला, तर त्याची राख नदीत टाकू नका. ती राख शेतीतील मातीत टाका. किंवा त्या व्यक्तीच्या नावाने झाड लावून, त्या झाडाला ती राख टाका, झाडे वाढतील आणि नद्या निर्मळ राहतील, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.

राख शेतात टाका. शेतात नसेल तर घरी घेऊन ती झाडाच्या कुंडीत टाका. गावातला माणूस गावात सुखाने जगेल हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं. नदी स्वच्छ होईल. शिवार झाडांनी भरुन जाईल, शिवरायांचं स्वप्न साकार होईलफ, असं इंदोरीकर महाराजांनी सांगितलं.

ज्ञानोबाराय पण झाडं लावण्याचा सल्ला देत होते. झाडाला एक वर्ष पाणी घातलं तर झाड माणसाला आयुष्यभर सेवा देईल. शाळेत जाणार्‍यांनी शाळेत एक झाड लावावं, सासरी आलेल्या मुलीने बापाच्या आठवणीत एक झाड लावावं, माहेरी आलेल्या लेकीने आपली आठवण म्हणून झाड लावावं, ग्रामपंचायत सदस्यांनी निवडून आलो म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये 2 झाडं लावावीत, असा सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.

चाहत्यांना शांततेचे आवाहन
इंदोरीकर महाराजांचे समर्थक मोर्चे आणि आंदोलनाच्या तयारीत आहेत. सोशल मीडियावर तशी चर्चाही आहे. ‘चलो अहमदनगर’ असा नारा समर्थकाकडून लगावला जात आहे. पण इंदोरीकर महाराजांनी आपल्या समर्थकांना असं काहीही करू नका अशी विनंती केली आहे. जे काय आहे ते कायद्याने सिद्ध होईल असंही ते म्हणाले आहेत. इंदोरीकर महाराजांनी चाहत्यांना विनंती करणारं एक पत्रक जारी केलं आहे.

काय म्हटलेय पत्रकात?
आपण कोणीही, कोठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहे. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं, अशी विनंती.

इंदोरीकर महाराज जे बोलतात, ते आयुर्वेदातही आहे लिहिलेले

उस्मानाबाद – आयुर्वेदातही असे काही दाखले आहे की समसंख्येच्या तिथीला स्त्री-पुरूष संबंध आले तर पूत्रप्राप्ती होते तर विषम संख्येच्या तिथीला संबंध आले तर कन्यारत्न होते. बीएमएसच्या अभ्यासक्रमात या संदर्भात शिक्षण दिले जाते. यात अष्टांगहृदय, अष्टांगसंग्रह, सुश्रतसंहिता यात शरीर स्थानात गर्भावक्रांती, शुक्रशुनीशुद्धी अध्यायात म्हटले आहे की युग्मासू पुत्रस्या, अयुग्मू कन्यकः असा उल्लेख केला असल्याचे आयुर्वेदाचार्य शिवरत्न शेटे यांनी सांगून इंदोरीकर महाराज यांच्या स्त्री संगाच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्यासाठी त्यांनी आयुर्वेदातील दाखलेही दिले आहेत.

आयुर्वेदातील ग्रंथानुसार सम संख्या म्हणजे सहा, आठ, दहा, बारा या तिथीला स्त्री-पुरूष सहवास झाला तर पूत्र प्राप्ती होते. तर विषम दिवशी म्हणजे पाचव्या, सातव्या, नवव्या तिथीला स्त्री पुरूष सहवास झाला तर कन्या प्राप्ती होते. मासिक पाळी असलेल्या पहिला दिवस मानला हा दावा खरा असल्याचे शेटे यांनी म्हटले आहे. तर मासिक पाळीच्या 13 व्या दिवशी शरीर संबंध ठेवल्यास पूत्र नपुंसक होतो असेही त्यांनीही आयुर्वेदातील 1600 वर्षांपूर्वीच्या ग्रंथात लिहिले आहे, असे शेटे म्हटले आहे.

26 वर्षात झालं नाही ते आठवड्यात झालं..
किर्तनात इंदुरीकर महाराजांनी सध्या असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, मी महाराज होऊन 26 वर्ष झाली, पण 26 वर्षांत झालं नाही ते आठवड्यात झालं. 26 वर्ष बोलतोय तेच बोललो, पण तेव्हा काही झालं नाही. आत्ता झालं. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. मी आधीच सांगतो माझं बोलणं तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, तरुणींनो बाहेर फिरता आलं पाहिजे, संरक्षणाचे धडे घ्या आणि तरुणांनो मित्र तपासून घ्या, सोबत भावकी आणि नातेवाईकांपासून सावध रहा, असाही सल्ला इंदोरीकर महाराजांनी दिला.

गुन्हा दाखल करा, अंनिसची मागणी
किर्तनकार इंदुरीकर महाराजांवर PCPNDT च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने एक पत्र पाठवून त्याद्वारे ही मागणी केली आहे. अ‍ॅड. रंजना पगार-गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांना अर्ज करुन ही मागणी केली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या लेटरहेडवर हा अर्ज करण्यात आला आहे. सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. अशुभ वेळेला स्त्री संग झाल्यास अवलाद रांगडी, बेवडी आणि खानदानाचं नाव मातीत मिळवणारी होते. रावणाचा जन्म आण प्रल्हादाचा जन्म ही दोन उदाहरणंही आहेत असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. आता याप्रकरणी अंनिसने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कीर्तन कमी आणि तमाशाच जास्त असतो- कपिल पाटील
इंदुरीकर महाराजांचं म्हणजे कीर्तन कमी अन् तमाशा अधिक असतो, अशी टीका लोकभारतीचे आमदार कपील पाटील यांनी केली आहे.
इंदुरीकर महाराज याआधी शिक्षक होते. ते शिक्षकी पेशा सोडून कीर्तन करायला लागले. मला वाटलं कीर्तन बरं करतील. गाडगेबाबांच्या मार्गाने जातील. पण तसं काहीच दिसलं नाही. उलट माझ्या आजवरच्या अनुभवानं मला त्यांच्या कीर्तनात कीर्तन कमी आणि तमाश जास्त असल्याचं कपील पाटील यांनी म्हटलं आहे. इंदुुरीकर महाराज आपल्या कीर्तनात शिक्षकांची खिल्ली उडवतात याचं मला काही आश्चर्य वाटत नाही. त्यामुळे त्यांना जास्त काही सिरीअस घेऊ नका. लोकही घटकाभरच्या करमणुकीसाठी येत असल्याचाही टोला कपील यांनी लगावला.

वक्तव्य चुकीचेच- शेट्टी
आता या वादात शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उडी घेतली आहे. लिंग भेदाबाबत इंदुरीकर महाराजांच वक्तव्य चुकीचेच असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.स्त्री-पुरुष हा भेदभाव करणे चुकीचे आहे. महिलांचा सन्मान करायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आधीच आपल्याकडे स्त्री लिंगाच गर्भपात करण्याचे प्रमाण वाढले आहे, आणि अशा परिस्थितीत पुन्हा अशा प्रवृत्तीला चालना मिळेल किंवा प्रोत्साहन मिळेल अशा प्रकारचं वक्तव्य इंदुरीकर महाराजांसारख्या व्यक्तीने टाळले पाहिजे, असे शेट्टी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या